दैनिक स्थैर्य | दि. २५ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी या ठिकाणी झालेल्या ‘इंद्रधनुष्य २०२३’ स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटणच्या कुमार शुभम भोसले या विद्यार्थ्याची कला प्रकारातील ताल, वाद्य व कुमारी तनिष्का दौंडकर या विद्यार्थिनीची कला प्रकारातील लोकसंगीत तसेच कृषी महाविद्यालय, फलटणचा कुमार साहिल बनसोडे याची कला प्रकारातील लोकसंगीत व कुमारी वैष्णवी पुणेकर या विद्यार्थिनीची कला प्रकारातील नृत्य स्पर्धेसाठी निवड झाली. सदरील निवड झालेले श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणचे विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी होणार्या आंतर विद्यापीठीय इंद्रधनुष्य २०२३ स्पर्धेमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करतील.
आंतर विद्यापीठीय इंद्रधनुष्य २०२३ स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी विद्यापीठीय संघात स्थान मिळवून श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या व कृषि महाविद्यालयाचा नावलौकिक राज्य स्तरावर वाढविला आहे. सदरील आंतर विद्यापीठीय इंद्रधनुष्य २०२३ स्पर्धा निवडीसाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे मार्गदर्शन लाभले.
आंतर विद्यापीठीय इंद्रधनुष्य २०२३ स्पर्धेसाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथील विद्यार्थ्यांचे महात्मा फुले कृषि विद्यापीठीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र राज्य खो खो असोसिएशनचे अध्यक्ष व जिल्हा परिषद, सातारचे माजी अध्यक्ष, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे मे. गव्हर्निंग कौंसिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे व सांस्कृतिक विभागाचे अभिनंदन केले व भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.