
दैनिक स्थैर्य | दि. २७ मे २०२३ | फलटण |
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन समितीच्या राज्यस्तरीय अभ्यास प्रारूप समितीमध्ये कोरेगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजयकुमार बाचल यांची निवड राज्य ग्रामविकास व पंचायत राज मंत्रालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ.सुनिल भोकरे यांनी पत्राव्दारे केली.
१५ व्या वित्त आयोगातून ओला व सुका कचरा यांचे वेगवेगळे व्यवस्थापन व त्याची विल्हेवाट, पुनर्वापर तसेच सांडपाणी व्यवस्थापनासाठी शासकीय योजनांतून ग्रामपंचायत स्तरावर एकापेक्षा जास्त योजनांच्या अभिसरणाद्वारे आराखडा तयार करणेसाठी मार्गदर्शक सूचनांचे प्रारुप तयार करावे यासाठी राज्य ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण व क्रीडा व युवक कल्याण यांच्या आदेशानुसार घनकचरा व सांडपाणी प्रारुप व्यवस्थापन अभ्यास समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, ठाणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्र) सचिन घाडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग (साप्र) विशाल तनपुरे , जामखेड, जि.अहमदनगरचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणीपुरवठा व स्वच्छता शिवशंकर भारसाखळे, ग्रामविकास अधिकारी दिपक हिनकुले, केज बीडचे ग्रामसेवक सखाराम काशिद या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. यातील बहुतांश अधिकार्यांनी सातारा जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम केले असून स्वच्छता, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन याबाबत अत्यंत उत्कृष्ट रीतीने काम करून जिल्हा परिषद साताराला अनेक पुरस्कार मिळवून दिले आहेत.
या समितीकडे घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी व्यवस्थापन प्रारुप तयार करून सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्यस्तरीय समिती सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल संजयकुमार बाचल यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.