दैनिक स्थैर्य | दि. ४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
सोनवडी खुर्द (ता. फलटण) येथील अभिमन्यू सूळ याची राज्य उत्पादन शुल्क विभागात ‘एक्साईज पोलीस’पदी निवड झाली असून या यशाबद्दल अभिमन्यूचा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सत्कार केला.
अभिमन्यू सूळ याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा मोरोची या ठिकाणी झाले. त्यांनतर तो मामाचे गाव सोनवडी खुर्द (ता. फलटण) शिक्षणासाठी आला. आजी-आजोबा आणि मामा महादेव सोनवलकर यांच्या सांगण्यावरून त्याने जय भवानी हायस्कूल, तिरकवाडीला पाचवीमध्ये प्रवेश घेतला. अभिमन्यूने दहावीपर्यंतचे शिक्षण तिरकवाडी या शाळेत पूर्ण केले. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण बारामती येथे पूर्ण केले. त्यानंतर त्याने ‘मेकॅनिकल इंजिनिअरिंग’ची पदवी विटा सांगली या ठिकाणी घेतली. त्यानंतर त्याने पुणे येथे एमपीएससी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला.
पीएसआय परीक्षा ३ मार्क्संनी हुकल्यानंतर त्याने निराश न होता पुन्हा अभ्यास सुरू केला आणि शेवटी राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये ‘एक्साईज पोलीस’ म्हणून त्याची निवड झाली आहे.
या यशाने अभिमन्यूची आजी हौसाबाई सोनवलकर, आई संगीता सूळ आणि वडील निवृत्ती सूळ यांनी आनंद वक्त केला आहे. अभिमन्यूचा भाऊ अभिजित सूळ हा ‘मुंबई पोलीस’ म्हणून कार्यरत आहे.
अभिमन्यूचे मामा महादेव सोनवलकर यांनी आपल्या दोन्ही भाचे आपल्या गावी आणून त्यांना चांगले शिक्षण देऊन शासकीय सेवेत रुजू केले आहे.