
स्थैर्य, 29 जानेवारी, सातारा : प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नाव अनावधानाने न घेण्यासारखे आहे का असा सिजंवाल करत महाराष्ट्राचे मंत्री गिरीश महाजन यांनी हे अनावधानाने नाही तर जाणून बुजून केलेले कृत्य आहे म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख विसरणे म्हणजे छोट्या स्वरूपात लोकशाही संपवण्याची मनातली इच्छा व्यक्त होणे असाच आहे म्हणूनच आम्ही बहुजन ,कष्टकरी जनतेच्या वतीने या कृतीचा निषेध करीत असून मंत्री गिरीश महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहोत त्यांना या गुन्ह्याबद्दल महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून तडकाफडकी काढून टाकावे अशी मागणी करत आहोत अशी मागणी करणारे प्रसिद्धीपत्रक विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेले आहे.
विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या वतीने पुणे येथे झालेल्या 15 व्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ भारत पाटणकर , विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष कॉ धनाजी गुरव , सरचिटणीस कॉ डॉ जालिंदर घीगे , राज्य प्रवक्ते कॉ अविनाश कदम व कॉ विजय मांडके यांनी हे पत्रक प्रसिद्ध दिले आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीव्यवस्था शोषण संपवण्यासाठी अभ्यासपूर्ण सिद्धांत मांडला. जातीय शोषण संपवण्यासाठी चळवळ केली. घटनेमध्ये शोषित जातींच्या जनतेला राखीव जागा देण्यासाठी आवश्यक तरतूद केली. आणि जातीय शोषण संपेपर्यंत ही तरतूद राहील असा विचार मांडला. यामुळेच मंत्री महाजनांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरचा राग असण्याची शक्यता येते. कारण त्यांना मनुवादी उच्चनीचेतेच्या आधारावरची जातीय शोषणाची उतरंड संपू नये असेच वाटत असले पाहिजे असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.
भारतीय राज्यघटनेमुळे एक व्यक्ती – एक मत अशी समता प्रस्थापित झाली.. गरीब – श्रीमंत , स्त्री– पुरुष , उच्च जाती – नीच जाती अशी विषमता न ठेवता सर्वांना मतदानाच्या क्षेत्रात एका स्तरावर, एका दर्जावर आणले गेले. याचा राग मंत्री गिरीश महाजन यांच्या मनात असू शकतो राज्यघटनेमुळे भाषण स्वातंत्र्य , लेखन स्वातंत्र्य , शांततामय मार्गाने आंदोलने करण्याचे स्वातंत्र्य सर्वांना दिले आहे. लोकशाही व्यवस्था घटनेच्या आधारावर तयार झाली आहे अशी लोकशाही निर्माण करण्यासाठी अभ्यासपूर्ण तरतुदी करण्याचे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ते मंत्री गिरीश महाजनांना मान्य नसल्यामुळे त्यांचा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर राग असू शकतो. असेही प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

