उद्यापासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात कलम 144 लागू; सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी परंतु दर्शनाची व अभिवादनाची मुभा


दैनिक स्थैर्य | दि. 20 एप्रिल 2023 | फलटण | फलटण शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन विविध गटांकडून करण्यात आलेले आहे. याबाबत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये; म्हणून फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी कलम 144 लागू केलेले आहे. यामध्ये कोणतेही सार्वजनिक कार्यक्रम घेण्यासाठी प्रतिबंध करण्यात आलेले आहे; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन व अभिवादनासाठी मुभा देण्यात आलेली आहे.

यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक ते उपजिल्हा रुग्णालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते फलटण बसस्थानक या परिसरामध्ये दि. 21 एप्रिल रोजी सायं. 6 वाजल्यापासून ते 22 एप्रिल रोजी रात्री 12 वाजेपर्यंत शासकीय कार्यक्रमाव्यतिरिक्त खाजगी वैयक्तिक व खाजगी सार्वजनिक कार्यक्रमांना प्रतिबंध करण्यात आलेले आहे. मात्र सदर परिसरामध्ये नागरिकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दर्शनाला व अभिवादनाला मुभा असेल.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी लागणाऱ्या सर्व साहित्याबाबत व त्यामध्ये असणाऱ्या नियोजनाबाबत फलटण नगर परिषदेचे प्रशासन याबाबत पुढील कार्यवाही करणार आहे. या सोबतच छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सजावट सुद्धा फलटण नगर परिषदेच्या प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे, असेही आदेश फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी पारित केलेले आहेत.


Back to top button
Don`t copy text!