मिरगाव झेडपी शाळेत विज्ञान प्रदर्शन उत्साहात संपन्न; विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्याचा प्रयत्न


स्थैर्य, मिरगाव, दि. २४ सप्टेंबर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागावा, या उद्देशाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मिरगाव येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशन आणि कमिन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन आदर्की बीटच्या विस्तार अधिकारी सौ. अलका माने यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “विज्ञान प्रदर्शनामुळे मुलांमधील सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजतो. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम अत्यंत उपयुक्त आहेत.” त्यांनी या शैक्षणिक कार्याबद्दल आयोजकांचे आभार मानले.

या प्रदर्शनात शाळेतील ३० विद्यार्थ्यांनी गणित आणि विज्ञानावर आधारित विविध उपकरणे व प्रयोग सादर केले. तसेच, अगस्त्य फाउंडेशनने आणलेली शैक्षणिक मॉडेल्स विद्यार्थ्यांसाठी विशेष आकर्षणाचे केंद्र ठरली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रयोगशीलता आणि चौकस वृत्ती वाढत असल्याचे दिसून आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवताना शाळेचे मुख्याध्यापक कचरे यांनी सांगितले की, “या उपक्रमामुळे शाळेतील न बोलणारे विद्यार्थीही आत्मविश्वासाने आपले प्रयोग सादर करत आहेत. विद्यार्थ्यांमधील हा बदल हेच या प्रदर्शनाचे खरे यश आहे.”

यावेळी अगस्त्य इंटरनॅशनल फाउंडेशनचे प्रशिक्षक निलेश जाधव व सौ. शीतल गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.


Back to top button
Don`t copy text!