दैनिक स्थैर्य | दि. २ एप्रिल २०२४ | फलटण |
“बालवयात सुंदर हस्ताक्षराचे संस्कार झाले तर त्याचा खूप चांगला परिणाम मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर होतो. यासाठी शाळांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. पर्यायाने शाळा ह्या व्यक्तिमत्त्व विकासाचे केंद्र बनव्यात”, असे प्रतिपादन माजी प्राचार्य रविंद्र येवले यांनी केले.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा फलटण आयोजित आणि फलटण पंचायत समिती शिक्षण विभाग यांच्या सहकार्याने इ. ३ री ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी अनुलेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याच्या बक्षिस वितरणप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ होते. यावेळी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सूर्यवंशी (बेडके), सहाय्यक गटविकास अधिकारी एस. के. कुंभार, शिक्षण विस्तार अधिकारी सी. जी. मठपती, गट साधन केंद्राच्या गट समन्वयक दमयंती कुंभार, केंद्रप्रमुख दारासिंग निकाळजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“विद्यार्थ्यांना मराठी भाषा व साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी तालुका पातळीवर अनुलेखन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी फलटण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे मोलाचे सहकार्य लाभले. तालुक्यातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ७ हजार ६०० विद्यार्थांनी यामध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे ही बाब निश्चित अभिनंदनीय आणि मराठी भाषेची गोडी वाढविणारी आहे”, असे म.सा.प. फलटण शाखेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
“भाषण, वक्तृत्व आणि चित्रकला स्पर्धांचे सर्रासपणे आयोजन केले जाते. मात्र, मसाप फलटण शाखेने अनुलेखन सारखी एक आगळी वेगळी स्पर्धा घेऊन तालुक्यांतील बहुसंख्य विद्यार्थ्यांना सहभाग नोंदवण्याची संधी उपलब्ध करून दिली. मसाप फलटण शाखेचा हा उपक्रम निश्चित मार्गदर्शक ठरेल”, असा विश्वास शिक्षण विस्तार अधिकारी सी. जी. मठपती यांनी व्यक्त केला.
सचिन सूर्यवंशी (बेडके), श्री. कुंभार, दमयंती कुंभार यांनीही या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
प्रारंभी विजेत्या विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक आणि केंद्र प्रमुख यांचे उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते पुस्तक, प्रमाणपत्र आणि पुष्प देऊन गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचेकडून महाराष्ट्राचे शिल्पकार या योजनेअंतर्गत श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांचे चरित्र प्रकाशित झाल्याबद्दल रविंद्र बेडकिहाळ, श्रीराम एज्युकेशन सोसायटीला शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सचिन सूर्यवंशी (बेडके), महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणेच्या इतिहास विषय समितीवर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ताराचंद आवळे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचेकडून महाराष्ट्राचे शिल्पकार या योजनेअंतर्गत मुंबईचे शिल्पकार ना. जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांचे चरित्र प्रकाशित झाल्याबद्दल अमर शेंडे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सन्मान करण्यात आला.
सदर अनुलेखन स्पर्धेचे अशोक सस्ते, विजया भोसले, हेमलता गुंजवटे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला. कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी प्रास्ताविक केले. अलका बेडकिहाळ आणि अमर शेंडे यांनी स्वागत केले. कार्यवाह ताराचंद्र आवळे यांनी सूत्रसंचालन केले. हेमलता गुंजवटे यांनी आभार मानले.
अनुलेखन स्पर्धेचा तालुकास्तरीय निकाल पुढीलप्रमाणे :
इयत्ता तिसरी, कंसात शाळा – वैष्णव विकास खराडे (प्रथम क्रमांक, जि. प. शाळा काळज), ईश्वरी महेश शिंदे (व्दितीय क्रमांक, जि. प. शाळा तांबवे), स्वरांजली संदीप भोसले (तृतीय क्रमांक, जि. प. शाळा हणमंतवाडी), राधिका प्रदीप तरटे (उत्तेजनार्थ, जि. प. शाळा तरटेवस्ती).
इयत्ता चौथी कंसात शाळा – ईश्वरी संतोष पन्हाळे (प्रथम क्रमांक, जि. प. शाळा जुनागाव वाठार निंबाळकर), वीणा रोहित भोईटे (व्दितीय क्रमांक, जि. प. शाळा निंबळक), वीरा हेमंतकुमार कदम (तृतीय क्रमांक, जि. प. शाळा गिरवी), समृद्धी सचिन गावडे (उत्तेजनार्थ, जि. प. शाळा गोखळी).
इयत्ता पाचवी कंसात शाळा – श्रेया दिलीप अडसूळ (प्रथम क्रमांक, जि. प. शाळा निंभोरे), राजनंदिनी गणेश कारंडे (व्दितीय क्रमांक, जि. प. शाळा हणमंतवाडी), ज्ञानेश्वरी पांडुरंग ढमाळ (तृतीय क्रमांक, जि. प. शाळा हिंगणगाव), कार्तिकी मनोज जाधव (उत्तेजनार्थ, जि. प. शाळा कापशी).