दैनिक स्थैर्य । दि. २४ मे २०२२ । फलटण । कृषी प्रधान देशातील नवी पिढी उच्च पदस्थ अधिकारी पदाच्या नोकऱ्या, उद्योग व्यवसायाबरोबर आपल्या बुध्दी कौशल्याचा वापर करुन शेतीमध्ये नवे तंत्रज्ञान, सुधारित औजारे घेऊन शेती किफायतशीर व इतरांना मार्गदर्शक ठरेल अशा पद्धतीने करु शकतात हेच अमित शिंदे यांनी निर्यातक्षम केळी उत्पादनातून दाखवून दिल्याचे गौरवोद्गार मालोजीराजे सहकारी बँकेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त करीत अमित शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
शिंदेनगर, ता. फलटण येथील रहिवासी कुटुंबातील अमित अशोकराव शिंदे, अक्षय अनिलराव शिंदे, हेमंत संपतराव शिंदे आणि पवन छगनराव निकम या युवा शेतकऱ्यांनी शिंदेवाडी, माळशिरस येथील आपल्या शेती क्षेत्रावर एकूण ९ एकर क्षेत्रावर सन २०११ पासून आज अखेर निर्यातक्षम केळीच्या बागा तयार केल्या असून सन २०२० पासून गेली ३ वर्षे या क्षेत्रातील केळी आय एन आय फार्मस प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून मध्य पूर्वेत निर्यात होत असून या केळीच्या बागांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी सदिच्छा भेट देवून पाहणी केली, त्यावेळी अमित शिंदे यांनी त्यांना संपूर्ण माहिती दिली.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक व प्रगतशील शेतकरी दत्तात्रय मानसिंग शिंदे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे स्वागत केले. त्यावेळी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे, अशोकराव शिंदे, कुरोली फुडसचे उमेश नाईक निंबाळकर, अक्षय शिंदे, हेमंत शिंदे, दीपक शिंदे, पवन निकम, विठ्ठलराव कदम यांच्यासह शिंदे कुटुंबीय उपस्थित होते.
सद्यस्थितीत फायदेशीर म्हणून ऊसाकडे ओढा
अलीकडे मजुरांची वाढती समस्या, शेतमालाला बाजारात मिळणारी कवडी मोल किंमत, विक्रीची सक्षम व्यवस्था नसल्याने मोठ्या प्रमाणावर शेती उत्पादन करताना शेतमाल साठवण व सक्षम वाहतूक व्यवस्था नसल्याने उत्पादित शेतमाल दूरच्या बाजार पेठे पर्यंत पोहचविताना शेतकऱ्यांची होणारी कुचंबना टाळण्यासाठी पर्याय म्हणून मोठ्या क्षेत्रावर ऊस लागवडीचा पर्याय बहुसंख्य शेतकऱ्यांनी स्वीकारला असल्याचे अमित शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
ऊस क्षेत्रात मजूर समस्या राहिली नाही
ऊस लागवड करताना ट्रॅक्टरला जोडता येणारी ऊसासाठी सरी काढणे, ऊस लागण, ऊस खांदणी, बांधणी करणारी औजारे उपलब्ध आहेत, त्याचप्रमाणे ठिबक सिंचनाद्वारे ऊसाला पाणी देताना त्यामध्ये प्रवाही खते देण्याची व्यवस्था करता येत असल्याने तसेच संगणकीय यंत्रणेच्या माध्यमातून किती व कोणती खते कधी द्यावीत याचे नियोजन करणे शक्य असल्याने केवळ एक व्यक्ती कितीही मोठे क्षेत्र असले तरी त्याची व्यवस्था पाहु शकतो, पीक तयार झाल्यावर त्याची तोडणी, वाहतूक, गाळप व्यवस्था साखर कारखान्यांची यंत्रणा करीत असल्याने, त्याचप्रमाणे एफआरपी द्वारे ऊसाच्या दराची हमी असून सदर रक्कम शेतकऱ्याची बँक खात्यावर नियमाप्रमाणे जमा होत असल्याने शेतकऱ्यांनी अन्य पिका ऐवजी ऊसाला प्राधान्य दिले आहे. छोटा शेतकरीही ऊस पीक लागणी साठी मजुराची मदत घेऊन पीक तयार होईपर्यंत स्वतः जबाबदारी घेतो, पुढे तोडणी, वाहतूक, गाळप व्यवस्था साखर कारखाने करीत असल्याने छोटा मोठा सर्वच शेतकऱ्यांनी ऊसाला प्राधान्य दिल्याचे दिसते.
जमिनीचा पोत बिघडल्याने उत्पादनात घट शक्य
तथापि ऊसाला लागणारे अधिक पाणी व मोठ्या प्रमाणावरील रासायनिक खतांच्या वापराने जमिनींचा पोत खराब होत असल्याने एकरी उत्पादनात दिवसेंदिवस घट येत असल्याचे लक्षात आल्यावर आता ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पर्यायी पिके शोधण्यास सुरुवात केल्याचे अमित शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
केळी पर्याय नाही पण पूरक पीक
त्या पार्श्वभूमीवर केळी हा पर्याय नसेल पण ऊसाबरोबर काही क्षेत्रावर केळीच्या बागा घेण्यास सुरुवात केली, गेल्या १०/११ वर्षात आम्हाला समाधान वाटले आणि २ वर्षांपासून केळी परदेशी जाऊ लागल्यापासून अधिक समाधान लाभल्याचे सांगत केळी परदेशी पाठविताना आम्ही केवळ दर्जेदार उत्पादन आणि रसायन मुक्त क्षेत्र या दोन बाबी सांभाळल्या असून आय एन आय फार्मस प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून उत्पादित केळी परदेशी पाठवीत आहोत, त्यामुळे केवळ दर्जेदार उत्पादन एवढीच आमची जबाबदारी आहे, परदेशी पाठविणे, त्याची विक्री, वेळेवर पैसा येणे याबाबी कंपनीचे प्रतिनिधी श्री रणजित कडलग आणि श्री अमोल सुर्यवंशी हे पाहतात. उत्पादना बाबतही त्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे अमित शिंदे यांनी यावेळी सांगितले.
निर्यातदार कंपनीचे मार्गदर्शन व सहकार्य फलदायी
आय एन आय फार्मस प्रा. ली. कंपनीच्या माध्यमातून केळी निर्यात केल्याने कंपनीच्या माध्यमातून आपल्या केळी बागेचे कंपनीच्या तज्ञांमार्फत बागेची पाहणी करण्यात येते त्यातून आवश्यक मार्गदर्शन, खर्चात बचत आणि फ्रूट केअर द्वारे निर्यातक्षम घड निर्मिती याचा लाभ मिळतो, केळीची तोडणी झाल्यानंतर निर्धारित दराप्रमाणे योग्य रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर लगेच जमा केली जाते तसेच स्थानिक व्यापाऱ्यापेक्षा प्रती किलो २ ते ३ रुपये दर अधिक मिळत असल्याचे अमित शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले.
केळीचा बेवड ऊसासाठी उपयुक्त
म्हणजे ज्या प्रमाणे ऊस तयार झाल्यावर साखर कारखाने तोडणी, वाहतूक, गाळपाची जबाबदारी घेतात त्याप्रमाणे कंपनी पीक तयार झाल्यावरची संपूर्ण जबाबदारी घेत असल्याने ऊसा प्रमाणे केळी उत्पादन सोईचे आहे, मात्र ऊसापेक्षा पाणी व खते कमी लागत असल्याने जमिनीचा पोत बिघडण्याची शक्यता नाही किंबहुना केळीचा बेवड ऊसाला फायदेशीर ठरत असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी ऊसा बरोबर केळीच्या बागा जरुर घ्याव्यात अशी अपेक्षा अमित शिंदे यांनी व्यक्त केली आहे.
केळी लागवड आर्थिक दृष्ट्या फायदेशीर
केळी लागवड व मेहनत, मशागत, खत, पाणी, कीटक नाशक यासाठी एकरी १ लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे एकरी ३० टन उत्पन्न मिळते आणि निर्यात क्षम केळी प्रती किलो १५ रुपये दराने आज विक्री होत असल्याचे अमित शिंदे यांनी सांगितले.