सविता काशीद हिला चार वर्ष साध्या कैदेची शिक्षा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑगस्ट २०२२ । सातारा । अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन मुलाने अत्याचार करत तिचा खून केला. त्यानंतर मुलाच्या आईने त्यास मदत केल्याप्रकरणी नेर, ता. खटाव येथील सविता निलेश काशिद वय ३४ या महिलेला वडूज येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने ४ वर्षे साधी कैद व १ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीमती सविता काशिद हिने फिर्यादीच्या राहत्या घरासमोरील एका बंगल्याच्या टेरेसवरील खोलीत पीडित अल्पवयीन मुलीस जिल्हा परिषद शाळेसमोरुन फुस लावून नेले होते. तिथे अल्पवयीन मुलाने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर महिलेने तिचा गळा दाबून खून केला होता. तसेच मृतदेह विहिरीत टाकून पुरावा नष्ट केला होता. याबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी तपास केला. उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्रे, सपोनि संदिप शितोळे यांच्या सहकार्याने गायकवाड यांनी साक्षीदारांचे जबाब नोंदवून वैद्यकीय पुराव्यासह वडूज सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

सरकारी वकील श्रीमती अनुराधा निंबाळकर यांनी सरकार पक्षाच्यावतीने सहा साक्षीदारांचे जाबजबाब नोंदवून फिर्यादी पक्षाची बाजू भक्कमपणे मांडली. कागदोपत्री पुरावा, वैद्यकीय पुरावा ग्राह्य धरुन आरोपी सविता निलेश काशिद (रा. नेर, मुळ रा. मालगाव ता. जि. सातारा) हिला न्या. पी. वाय. काळे यांनी 4 वर्षे साधी कैद व 1 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. याकामी पुसेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस फौजदार दत्तात्रय जाधव, पोलिस हावलदार श्रीमती दडस, अक्षय शिंदे, सागर सजगणे, घाडगे यांचे न्यायालयास सहकार्य लाभले.


Back to top button
Don`t copy text!