सौरभ राजू शेट्टी फलटण तालुका दौर्‍यावर; महावितरणचे मुख्य अभियंता आवळेकर यांची घेतली भेट, कृषीपंपांच्या समस्यांबाबत केली चर्चा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२३ | फलटण |
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव विद्यार्थी परिषद प्रमुख सौरभ राजू शेट्टी यांचा काल मंगळवारी फलटण तालुका दौरा झाला. यावेळी सौरभ शेट्टी यांनी फलटणच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाचे मुख्य अभियंता आवळेकर यांची भेट घेतली व फलटण तालुक्यातील शेतकर्‍यांच्या कृषीपंपाच्या समस्यांबाबत चर्चा केली. तसेच शेतीपंपाच्या डीपी चोरीबाबत व इतर मागण्यांबाबत चर्चा केली.

फलटण तालुका महावितरण कार्यालयाअंतर्गत येणार्‍या ढवळ, वाखरी येथील शेरेवाडी चिंतामणी डीपी नंबर दोन हा डीपी बसवल्यानंतर दोन-तीन दिवसात जळतो. अशा घटना तीन ते चारवेळा झालेल्या आहेत आणि हा चिंतामणी डीपी चारवेळा चोरीला सुद्धा गेलेला आहे. अशा डीपी चोरीच्या घटना ज्या ज्या विभागात घडतात, त्या भागात आपण योग्य त्या उपाययोजना करून संबंधित शेतकर्‍यांना योग्य तो न्याय द्यावा.

वरील डीपींच्या तक्रारींप्रमाणेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण महावितरणकडे मागण्या केल्या की, फलटण तालुक्यात जे नादुरूस्त डीपी आहेत ते त्वरित बदलून मिळावेत, डीपीच्या फ्यूज बॉक्स व त्यांच्यातील फ्यूज व्यवस्थित करून घ्याव्यात, शेतीतील व गावठाण हद्दीतील ज्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे धोकादायक पोल आहेत ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत करून घेण्यात यावेत, शेती पिकातील दोन्ही पोलमधील असणार्‍या वायर काही ठिकाणी जमिनीपासून योग्य अंतरावर नाहीत, त्या योग्य अंतरावर ताण देऊन वेळेत दुरूस्ती करून घ्याव्यात, शेतीपंपाच्या डीपी व त्याच्या केबल ह्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने बदलून द्याव्यात, त्याचा भार शेतकर्‍यांवर टाकू नये, शेतकर्‍यांकडून ज्या ठिकाणी विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी पैशाची मागणी करतात, अशा कर्मचार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात याव्यात.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वरील मागण्यांवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने वेळेत योग्य तो पर्याय काढावा, अशी मागणीही स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावेळी केली.तसेच सौरभ शेट्टी यांनी फलटण तालुक्यातील निरगुडी गावचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते गोरख लालासो सस्ते यांच्या घरी भेट व कार्यकर्त्यांची विचारपूस केली.

या दौर्‍यावेळी फलटण तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, राज्य प्रवक्ता प्रमोद गाडे, डॉ. रवींद्र घाडगे, सचिन खानविलकर व कार्यकर्ते उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!