स्थैर्य, फलटण, दि. ७ : महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ लातूर येथील दुग्धशाळेच्या विभागाचे कामकाज समाधानकारक असून आगामी काळामध्ये लातूर येथील संपूर्ण युनिट सक्षम करण्याच्या दृष्टीने महानंद पावले उचलेल, असे आश्वासन महानंदचे उपाध्यक्ष डी. के. पवार यांनी दिले.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या लातूर दुग्धशाळेला महानंदचे उपाध्यक्ष डी के पवार यांनी विविध मान्यवरांसह सदिच्छा भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते.
महानंदचे उपाध्यक्ष व वनश्री पुरस्कार प्राप्त असणारे डी. के. पवार यांच्या हस्ते लातूर येथील दुग्धशाळेच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी उपाध्यक्ष डी. के. पवार यांच्यापासून प्रेरणा घेऊन लातूर दुग्धशाळेच्या युनिटच्या वतीने एक हजार वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे.
यावेळी फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर, साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माणिकराव भोसले, दत्तकृपा डेअरी साखरवाडीचे चेअरमन शरद जाधव, विजय रुपनवर, विशाल सोनवणे यांच्यासह महानंदच्या लातूर दुग्धशाळेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.