दैनिक स्थैर्य । दि. १८ ऑगस्ट २०२२ । सातारा । स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे श्री. शाहू कला मंदिर सातारा येथे स्वराज्य महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामुळे सातारकर झाले मंत्रमुग्ध.
सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, अपर जिल्हाधिकारी माधवी सरदेशमुख व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते.
खासदार श्री. पाटील म्हणाले, मी स्वातंत्र्य दिवस पाहिलेला माणूस आहे. आपला जिल्हा हा क्रांतिकारांचा, शुरविरांचा तसेच आजी-माजी सैनिकांचा जिल्हा आहे. सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रात आगळेवेगळी ओळख आहे. जिल्हा प्रशासनाकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात आलेले कार्यक्रम स्तुत्य असे होते. या कार्यक्रमांमध्ये सातारा वासियांनीही उस्फुर्त असा सहभाग घेतला. आपल्या देशाची एकता आणखीन अबाधित ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया, असेही आवाहन श्री. पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. जयवंशी म्हणाले, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याचबरोबर 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात आले. यामुळे देशप्रेम आणखीन वाढीस मदत होणार. तसेच स्वातंत्र्याचे असे अनेक महोत्सव आपल्याला यापुढेही सर्वांनी मिळून साजरा करावयाचे आहेत. भारताला जगात महाशक्ती करण्यासाठी प्रत्येकाने विकासात योगदान द्यावे त्यांनी यावेळी सांगितले.
तपस्या सिद्धी नृत्य ॲकडमी, कोल्हापूरच्या नृत्याचंद्रिका संयोगीता पाटील व त्यांचा शिष्यवृंद यांनी प्रारंभी देशभक्तीपर नृत्य सादर केले .तसेच नवक्षितिज पुणे या मतिमंद कल्याण संस्थेच्या कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले. यावेळी प्रसिध्द शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांचे गायनाने तर सातारकर मंत्रमुग्ध झाले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त विविध उपक्रम प्रभावीपणे राबविल्याबद्दल उत्कृष्ट तालुका म्हणून प्रथम क्रमांक वाई, द्वितीय क्रमांक फलटण आणि तृतीय क्रमांक पाटण या तालुक्यांच्या प्रांताधिकारी, तहसिलदार आणि गटविकास अधिकारी गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.