साताऱ्यात झेडपी शाळांचा पहिलीचा वर्ग यंदा १ एप्रिलपासून सुरू होणार


 गुणवत्तावाढीसाठी सातारा जिल्हा परिषदेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, यंदा पहिल्यांदाच इयत्ता पहिलीचे वर्ग जूनऐवजी १ एप्रिलपासून सुरू होणार आहेत.

 स्थैर्य, सातारा, दि. ३० मार्च : सातारा जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार यंदा प्रथमच जिल्हा परिषद शाळांमध्ये इयत्ता पहिलीचे वर्ग जून महिन्याऐवजी बुधवार (१ एप्रिल) पासूनच सुरू होणार आहेत. एरवी नवीन शैक्षणिक वर्षाचा आरंभ जून महिन्यापासून होतो, मात्र यंदा एप्रिलमध्येच शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.

आधार नोंदणी आणि पाटीचा वापर

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन उपक्रम राबवला जाणार आहे. याअंतर्गत पहिलीला दाखलपात्र विद्यार्थ्यांचे आधारकार्ड काढले जाणार आहे. तसेच, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या १०० टक्के विद्यार्थ्यांनी पाटीचा (स्लेट) वापर करावा, यादृष्टीने विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

शैक्षणिक मेळावे आणि लोकसहभाग

पहिलीसाठी दाखलपात्र विद्यार्थ्यांची ११ मार्च ते ३० एप्रिल या कालावधीत नोंदणी करण्यात येत आहे. तसेच १ ते २० एप्रिल या दरम्यान शैक्षणिक प्रक्रियेत लोकसहभागाला अधिकाधिक प्राधान्य दिले जाणार आहे. याशिवाय १५ ते ३० एप्रिल या कालावधीत विशेष शैक्षणिक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

“सध्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम सुरू आहेत. त्याच अनुषंगाने पहिलीचे वर्ग लवकर सुरू करण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे.”अनिस नायकवडी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

“जिल्हा परिषदेच्या शाळांत सध्या विविध सुविधा पुरवण्यावर भर देण्यात आला असून, शैक्षणिक दर्जात मोठी सुधारणा झाली आहे. त्यामुळे झेडपी शाळांकडे विद्यार्थी आणि पालकांचा कल वाढत चालला आहे.”

याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी


Back to top button
Don`t copy text!