शनिवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासन सज्ज; फलटण तालुक्यात २,५३,२२७ मतदार बजावणार हक्क! दोन मते देणे बंधनकारक


फलटण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज. येत्या शनिवारी (दि. ०७) २८२ केंद्रांवर होणार मतदान. एकूण २,५३,२२७ मतदार ठरवणार उमेदवारांचे भवितव्य. मतपत्रिकेचे रंग आणि प्रक्रियेची माहिती जाणून घ्या.

स्थैर्य, फलटण, दि. 05 फेब्रुवारी : सातारा जिल्हा परिषद आणि फलटण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून, येत्या शनिवारी, दिनांक ०७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी तालुक्यात एकूण २ लाख ५३ हजार २२७ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली.

२८२ मतदान केंद्रे सज्ज

फलटण तालुक्यात जिल्हा परिषदेचे ८ गट आणि पंचायत समितीचे १६ गण असून, मतदानासाठी एकूण २८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर एक नियंत्रण युनिट (CU) आणि एक मतदान युनिट (BU) वापरले जाणार आहे.

महत्त्वाचे: प्रत्येक मतदाराला ‘दोन’ मते देणे अनिवार्य

मतदान प्रक्रियेबाबत माहिती देताना प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, प्रत्येक मतदाराला जिल्हा परिषदेसाठी एक आणि पंचायत समितीसाठी एक, अशी दोन मते देण्याचा अधिकार आहे.

  • मतपत्रिकेचे रंग: मतदान युनिटमध्ये वरच्या बाजूस पांढऱ्या रंगाची जिल्हा परिषदेची मतपत्रिका असेल, तर खालच्या बाजूस गुलाबी रंगाची पंचायत समितीची मतपत्रिका असणार आहे.

  • प्रक्रिया: मतदाराने उमेदवाराच्या नावासमोरील बटन दाबल्यानंतर लाल दिवा लागेल. मात्र, दोन्ही (झेड.पी. आणि पं.स.) मते दिल्याशिवाय मतदान पूर्ण होणार नाही आणि नियंत्रण युनिटवर ‘बीप’ आवाज येणार नाही, याची मतदारांनी नोंद घ्यावी.

मतदारांची अंतिम आकडेवारी: फलटण तालुक्यातील एकूण मतदार संख्या खालीलप्रमाणे आहे:

  • एकूण मतदार: २,५३,२२७

  • पुरुष मतदार: १,२९,७४६

  • स्त्री मतदार: १,२३,४७२

  • इतर मतदार: ०९

गटनिहाय मतदार संख्या (सर्वाधिक मतदार कोळकी गटात)

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोळकी गट हा मतदार संख्येने सर्वात मोठा असून तेथे ३३,१५८ मतदार आहेत.

  • तरडगाव: ३०,२५१

  • साखरवाडी – पिंपळवाडी: ३२,०८४

  • विडणी: ३०,२९०

  • गुणवरे: ३२,१०५

  • बरड: ३३,०१४

  • कोळकी: ३३,१५८

  • वाठार निंबाळकर: ३२,०५५

  • हिंगणगाव: ३०,२७०

प्रशासनाचे आवाहन लोकशाहीने दिलेला हा अनमोल हक्क सर्व मतदारांनी शनिवारी (दि. ०७) निर्भयपणे बजावावा, असे आवाहन प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर आणि तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!