स्थैर्य, सातारा, दि.१३ : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत
पाटील यांनी कोरोना लॉकडाउनच्या काळात घेतलेल्या अभिप्राय अभियानात सातारा
जिल्ह्याने राज्यात सर्वाधिक 86 हजार अभिप्राय पाठविले होते. या अभियानात
उत्कृष्ट काम केल्याबद्दल सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना खासदार शरद
पवार यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिनी मुंबईतील
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित कार्यक्रमात श्री. माने यांचा गौरव
करण्यात आला. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर,
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल उपस्थित
होते. कोरोनाच्या काळात सामान्य जनतेकडून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाविषयी
अभिप्राय मागविले होते. त्यासाठी प्रश्नावली होती. 20 दिवसांत ही
प्रश्नावली भरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवायची होती.
यामध्ये साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पक्षाच्या पदाधिकारी
व कार्यकर्त्यांनी चांगले काम केले. कोरोनाच्या काळातही पक्षासाठी चांगले
काम करून तब्बल 86 हजार अभिप्राय प्रदेश कार्यालयास पाठविले होते.
राज्यभरातून सात लाख 81 हजार अभिप्राय पक्षाकडे प्राप्त झाले होते. यामध्ये
जिल्ह्यातील जनतेने सर्वाधिक 86 हजार अभिप्राय पाठविल्याने जिल्हाध्यक्ष
माने यांचा काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या हस्ते
ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. दुसरा क्रमांक वाशिम जिल्ह्याला आला आहे.
राज्यात चांगले काम केल्याबद्दल श्री. पवार यांनी सुनील माने यांचे कौतुक
केले आहे.