
सातारा जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला असून साताऱ्याचा पारा ४० अंश सेल्सिअसवर, तर थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरचे तापमान ३४.७ अंशांवर पोहोचले आहे. वाढत्या उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर अघोषित संचारबंदीचे चित्र आहे.
स्थैर्य, सातारा, दि. १३ एप्रिल : एप्रिलचा मध्य सुरू झाल्यानंतर सातारा जिल्ह्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढू लागला आहे. सातारचे कमाल तापमान ४०.० अंश सेल्सिअसवर पोहोचले असून, थंड हवेचे ठिकाण समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरचा पाराही ३४.७ अंशांवर गेला आहे. सातारा जिल्ह्यात सध्या उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून, दुपारच्या कडक उन्हामुळे वर्दळीचे रस्ते पूर्णपणे ओस पडत आहेत.
सकाळपासूनच सूर्य ओकतोय आग; रस्त्यांवर शुकशुकाट
जिल्ह्यात सकाळी ९ वाजल्यापासूनच उन्हाची चटके बसण्यास सुरुवात होत आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत तर सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याची परिस्थिती निर्माण होत आहे. शहर व परिसरातील वर्दळीच्या रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट जाणवत असून, उन्हामुळे जणू अघोषित संचारबंदी पुकारल्यासारखे रस्ते ओस पडलेले दिसत आहेत. एप्रिलचा उत्तरार्ध आणि आगामी मे महिना सातारकरांसाठी अधिक कडक उन्हाचा असणार आहे.
थंड पेये आणि टोप्या, गॉगलला मोठी मागणी
उन्हाची लाहीलाही होत असल्याने थंड पेयांच्या दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. विविध प्रकारची कोल्ड्रिंक्स, ताक, सरबत, लस्सी, फळांचे ज्यूस आणि उसाच्या रसाला नागरिकांची सर्वाधिक पसंती आहे. दुपारच्या वेळी उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिक बागा आणि उद्यानांचा आधार घेत आहेत. याशिवाय बाजारात रंगीबेरंगी टोप्या, गॉगल आणि स्कार्फ यांनाही मोठी मागणी वाढली आहे.
उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे आवाहन
वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे यांनी नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे:
-
आहार आणि पाणी : दिवसभरात भरपूर आणि पुरेसे पाणी प्यावे. आहारात फलाहार, फळांचा रस, पालेभाज्या, सॅलेड, ताक आणि उसाच्या रसाचा जास्तीत जास्त वापर करावा.
-
हे टाळा : चहा, कॉफी जास्त पिणे टाळावे. मद्यपान अजिबात करू नये. एसीसारख्या एकदम थंड वातावरणातून थेट बाहेर उन्हात जाणे टाळावे.
-
वेळेचे नियोजन : दुपारी १२ ते ४ या कडक उन्हाच्या वेळेत शक्यतो कष्टाची कामे करणे टाळावे.
-
काळजी घ्या : तीव्र उन्हात घराबाहेर पडताना उपाशीपोटी बाहेर पडू नका. बाहेर जाताना पाण्याची बाटली आवर्जून सोबत ठेवावी.
-
संरक्षण : सैल व सुती कपडे वापरावेत. तसेच गॉगल, स्कार्फ, टोपी, समरकोट किंवा छत्री यांचा वापर करावा.
