साताऱ्यात आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांच्या मागणीत वाढ; नोकरी, शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांचा ओढा


नोकरी, शिक्षण आणि व्यवसायासाठी परदेशात जाणाऱ्या सातारकरांची संख्या वाढल्याने आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांच्या (International Driving License) मागणीत मोठी वाढ झाली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयातून ऑनलाइन प्रक्रिया सुलभ झाली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. ३१ मार्च : नोकरी, उच्चशिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात जाणाऱ्या सातारकरांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. परदेशात वास्तव्य करताना स्वत:चे वाहन चालवता यावे, यासाठी आवश्यक असणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय वाहन परवान्यांची’ (International Driving License) मागणीही आता जिल्ह्यात वाढली आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) आकडेवारीनुसार, मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा परवाना काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

चाचणीची गरज नाही, प्रक्रिया सुलभ

आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढण्यासाठी अर्जदाराला पुन्हा वाहन चालविण्याची चाचणी (ड्रायव्हिंग टेस्ट) द्यावी लागत नाही. मात्र, त्यांचा सध्याचा भारतीय वाहन परवाना, पासपोर्ट आणि व्हिसा यांची काटेकोर पडताळणी केली जाते.

परिवहन मंत्रालयाच्या ‘सारथी’ या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज भरताना सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतात. त्यानंतर केवळ मूळ कागदपत्रांच्या पडताळणीसाठी आरटीओ कार्यालयात जावे लागते. या प्रक्रियेत अर्जदाराच्या पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्सवरील पत्ता एकच असणे अनिवार्य आहे. २०१८ पूर्वी ही प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाइन असल्याने विलंब होत होता, मात्र आता ती जलद झाली आहे.

केवळ हलक्या वाहनांसाठी आणि एक वर्षाची वैधता

भारताशी करार असलेल्या देशांमध्येच हा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना चालतो. हा परवाना केवळ हलक्या वाहनांसाठी (LMV) दिला जातो; जड वाहनांसाठी तो लागू होत नाही. या परवान्याची वैधता एक वर्षाची असून, संबंधित देशांमध्ये कायदेशीररीत्या गाडी चालवण्यासाठी तो अत्यंत आवश्यक असतो.

“कोरोना काळात आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, आता परदेशात नोकरी आणि शिक्षणासाठी जाणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे जानेवारी २०२२ नंतर परवान्यांची मागणी वाढली असून, यंदाच्या वर्षातही चांगली वाढ दिसून येत आहे.”     संदीप म्हेत्रे, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.

गेल्या काही वर्षांतील आंतरराष्ट्रीय परवान्यांची आकडेवारी :

  • २०२१-२२ : ११०

  • २०२२-२३ : १२३

  • २०२३-२४ : १२०

  • २०२४-२५ : १२३ (प्राथमिक आकडेवारीनुसार १३३ जणांची प्रक्रिया पूर्ण)


Back to top button
Don`t copy text!