स्थैर्य, सातारा, दि. ०४ : पोवई नाका येथील सातारा प्रांताधिकारी आणि तहसिल कार्यालय एकाच परिसरात पूर्वापारपासून कार्यरत आहेत. ही जागा १.१० हे.आर. इतकी असून या जागेत इतरही कार्यालये असल्याने पार्किंगसह अनेक समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे उपविभागीय (प्रांत) अधिकारी व तहसील कार्यालय यांची नवीन वास्तू उभारणेसाठी शासनाच्या मालकीची करंजे तर्फ सातारा मधील सर्व्हे नं. ३१४ व ३१५ ही जागा उपलब्ध व्हावी आणि त्या जागेत सुसज्ज कार्यालय उभारावे अशी लेखी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी २५ फेब्रुवारी २०२१ रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली होती. ना. पवार यांनी त्याच दिवशी ही मागणी मान्य केली आणि सदर जागा उपलब्ध करून देण्याबरोबरच नवीन इमारत बांधण्यासाठी २०२१- २२ च्या अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करावी अशा सूचना महसूल आणि वित्त विभागाला केल्या आहेत.
यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. अजितदादा पवार यांची भेट घेऊन लेखी पत्र दिले होते. उपविभागीय अधिकारी कार्यालय सातारा व तहसिल कार्यालय सातारा ही दोन्ही कार्यालये पोवई नाक्याजवळ एकाच परिसरात पूर्वीपासून कार्यरत आहेत. सदर परिसराचे क्षेत्र १.१० हे.आर. इतके कमी असून त्याच आवारात अधिक्षक भूमी अभिलेख सातारा, उपअधिक्षक भूमि अभिलेख सातारा, दुय्यम निबंधक सातारा, नगर भूमापन अधिकारी सातारा, मुद्रांक जिल्हाधिकारी सातारा व सेतु कार्यालय सातारा ही सर्व कार्यालये आहेत. त्यातच ३१ स्टॅप व्हेंडर/ पिटीशन रायटर व कॅन्टीनही याच ठिकाणी आहे. त्यामुळे या परिसराच्या आवारात दररोज येणाऱ्या नागरिकांची संख्या खुप मोठी असून उपलब्ध जागा अत्यंत कमी पडत आहे. त्यामुळे अंतर्गत वाहनांची पार्किंग व्यवस्था पुरेशी करता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करता सातारा तालुक्यात अन्यत्र जागा उपलब्ध होणेच्या अनुषंगाने पाहणी करण्यात आली होती. करंजे तर्फ सातारा ता.जि. सातारा येथील सर्व्हे नं. ३१४ व ३१५ हे शासनाचे क्षेत्र असून सर्व्हे क्र. ३१४ व ३१५ मधील जागा मोकळी आहे. त्यामुळे हि जागा उपविभागीय अधिकारी सातारा व तहसील कार्यालय सातारा यांची नवीन वास्तू उभारणेसाठी उपलब्ध व्हावी आणि नवीन इमारत उभारणीसाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी ना. पवार यांच्याकडे केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्रावर लगेचच ना. पवार यांनी सदर कामाचा समावेश सन २०२१- २२ च्या अर्थसंकल्पात करावा अशा सूचना देणारा शेरा महसूल आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नावे मारला. दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. २६ फेब्रुवारी २०२१ रोजी उप मुख्यमंत्री ना. पवार यांच्या कार्यालयातून उप सचिव गजानन पाटील यांचे लेखी पत्र महसूल, वित्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठवण्यात आले असून त्यामध्ये ना. पवार यांच्या निर्देशानुसार आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी प्रांत आणि तहसील कार्यालयासाठी सुचवलेली जागा तातडीने उपलब्ध करून द्यावी आणि त्या जागेत नवीन इमारत बांधकामासाठी सन २०२१- २२ च्या अर्थसंकल्पात आवश्यक निधीची तरतूद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वास्तविक जागेची अडचण आणि आत्ता असलेली प्रांत कार्यालयाची इमारत ही पुरातन आहे. त्यामुळे नवीन जागेत सुसज्ज इमारत उभी राहिल्यास सर्वच अडचणी दूर होतील आणि जनतेची मोठी गैरसोय दूर होईल यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता. ना. पवार यांच्या सहकार्यामुळे त्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून प्रशासकीय सोपस्कार पूर्ण होऊन लवकरच नवीन इमारतीचे बांधकाम सुरु व्हावे यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे प्रयत्नशील आहेत.