
साताऱ्यातील घरगुती कार्यक्रमांसाठी अल्पदरात पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पाण्याची नासाडी टाळण्यासाठी पालिका एक हजार लिटर क्षमतेचे १० नवीन छोटे टँकर खरेदी करणार आहे.
स्थैर्य, सातारा, दि. ३१ मार्च : शहरासह विस्तारित भागात आयोजित होणाऱ्या घरगुती आणि छोटेखानी कार्यक्रमांसाठी आता सातारकरांना अल्पदरात पाणी उपलब्ध होणार आहे. पाण्याची साठवणूक आणि नासाडी टाळण्यासाठी, तसेच नागरिकांची गरज पूर्ण करण्यासाठी सातारा पालिकेने एक हजार लिटर क्षमतेचे १० नवीन छोटे टँकर खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
मोठ्या टँकरमुळे नागरिकांना आर्थिक भुर्दंड
शहरातील नागरिकांकडून अनेक घरगुती कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यासाठी पालिकेकडे पाण्याची मागणी नोंदवली जाते. अनेकदा एकाच दिवशी चारपेक्षा जास्त ठिकाणी छोट्या टँकरची मागणी झाल्यास ती पूर्ण करणे पालिकेला शक्य होत नाही. अशा वेळी नाइलाजास्तव पालिका मोठ्या टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा करते. मात्र, छोट्या टँकरपेक्षा मोठ्या टँकरचे पाण्याचे दर जास्त असल्याने नागरिकांवर विनाकारण आर्थिक ताण येतो. शिवाय, एवढे पाणी साठवण्याची व्यवस्था नसल्याने कार्यक्रम संपल्यानंतर उरलेल्या पाण्याची मोठी नासाडी होते.
१००० लिटर क्षमतेचे नवीन टँकर
पाण्याची नासाडी, नागरिकांचा आर्थिक भुर्दंड आणि पालिकेच्या यंत्रणेचा अपव्यय टाळण्यासाठी पालिकेने एक हजार लिटर क्षमतेचे १० छोटे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरजेएवढेच पाणी अल्पदरात पुरवणे शक्य होणार आहे. यासाठीची तांत्रिक प्रक्रिया पालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ट्रॅक्टरच्या मदतीने ओढून नेता येतील, असे टँकर पालिकेच्या वाहन विभागात दाखल होतील.
सध्या केवळ चारच टँकर सुरू
पालिकेच्या ताफ्यात पूर्वीपासून दहा छोटे टँकर आहेत. मात्र, बरीच वर्षे त्यांचा वापर झाल्याने त्यातील सहा टँकर सध्या वापरायोग्य राहिलेले नाहीत. सद्य:स्थितीत केवळ चारच छोट्या टँकरच्या मदतीने घरगुती कार्यक्रमांसाठी पाणी पुरवले जात आहे. नवीन टँकर ताफ्यात दाखल झाल्यानंतर सातारकरांची पाण्याची गैरसोय टळणार आहे.

