सातारा पालिका लढवायची, कामाला लागा खा. शरद पवार यांनी आदेश दिल्याची दीपक पवार यांची माहिती 

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,सातारा, दि. 20:  सातारा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्याशी आपण चर्चा केली असून पवार साहेबांनी महाआघाडीतील घटक पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्या, असे सांगतानाच सातारा पालिका लढवण्याचे संकेत देत ‘कामाला लागा’ अशा सूचना दिल्याचे  सातारा-जावली मतदार संघातील राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी सांगितले. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा विपर्यास करून लोकांसमोर वर्चस्व असल्याचे विरोधक सांगत आहेत. तथापि, ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीलाही मतदारांनी चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या अनुषंगाने दीपक पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी दीपक पवार म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर तालुक्यात आपलेच वर्चस्व असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, ग्रामपचांयत निवडणुकांत स्थानिक राजकारण आणि गावकी-भावकी हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. जावलीतील ज्या गावांवर आपले वर्चस्व असल्याचे विद्यमान आमदार सांगत आहेत, त्या गावांची यादी त्यांनी द्यावी, असे आव्हान त्यांनी दिले.
आगामी सातारा नगरपालिका निवडणुका लढवणार असून त्याबाबत आपण पक्षश्रेष्ठी खा. शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना यांच्यासोबत चर्चा करा, असे सांगत कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसमधून पालिका निवडणूक लढवण्यासाठी पाच ते सहा विद्यमान नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत. तसेच भाजपमध्ये सध्या असलेले अनेकजण सध्या आपली कुचंबणा होत असल्याचे सांगत आहेत. त्यामुळे सर्वांना सामावून घेत राष्ट्रवादी काँग्रेस आगामी सातारा नगरपालिका निवडणूक लढवणार असल्याचे दीपक पवार यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सातारा नगरपालिकेसाठीचा अजेंडा तयार असून लवकरच जाहीर करणार असल्याचे नमूद केले.

Back to top button
Don`t copy text!