सातारा-जावलीतील तांडा वस्त्यांमधील १२ विकासकामांसाठी १ कोटींचा निधी मंजूर


सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यातून सातारा आणि जावली तालुक्यातील तांडा वस्तीतील १२ विकासकामांसाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. २८ मार्च : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या विशेष पाठपुराव्यातून सातारा-जावली मतदारसंघातील विविध गावांमधील तांडा आणि वस्त्यांमधील १२ विकासकामे मार्गी लागणार आहेत. शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या ‘वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजने’तून यासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

सातारा तालुक्यातील मंजूर कामे

सातारा तालुक्यातील आकले येथील गोसावी वस्तीत रस्ता काँक्रीटीकरणासाठी ८ लाख, कळंबे येथील रामोशी वस्तीत बंदिस्त गटर आणि रस्त्यासाठी १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. यासोबतच शेंद्रे (५ लाख), वर्ये (१० लाख) आणि आंबवडे बुद्रुक येथील लोहारवस्तीत बंदिस्त गटर व रस्ता करण्यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

जावली तालुक्यातील विकासकामे

जावली तालुक्यातील बोंडारवाडी, जवळवाडी, म्हाते खुर्द, खर्शी तर्फ कुडाळ आणि गाळदेव येथील रस्ता काँक्रीटीकरण व बंदिस्त गटर या कामांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच, कारगाव येथील मानेवस्तीतील रस्ता काँक्रीटीकरणासाठी ७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना

या सर्व विकासकामांची निविदा प्रक्रिया आणि इतर शासकीय सोपस्कार तातडीने पूर्ण करून कामे सुरु करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

“मंजूर झालेली सर्व कामे अत्यंत दर्जेदार करावीत आणि ती वेळेत पूर्ण करावीत,” अशा कडक सूचना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!