दैनिक स्थैर्य | दि. २२ जानेवारी २०२५ | सातारा |
सातार्याजवळ असलेल्या खिंडवाडी परिसरातील उंटाच्या डोंगर परिसरात जखमी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी गेलेल्या पथकावर बिबट्याने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सातार्याचे वनक्षेत्रपाल डॉ. निवृत्ती चव्हाण हे जखमी झाले आहेत. त्यांना सातार्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात वनरक्षक सुहास काकडे, महेश अडागळे, सचिन कांबळे, मयूर अडागळे हेही जखमी झाले आहेत.
जखमी बिबट्याची वनविभागाला माहिती मिळाली होती. दुपारी पावणे चारच्या सुमारास हे पथक उंटाचा डोंगर परिसरात दाखल झाले. प्रशिक्षित कर्मचारी नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. वनविभागाच्या वतीने टाकण्यात आलेल्या जाळीमध्ये बिबट्या सापडला नाही. त्यामुळे चवताळलेल्या बिबट्याने चव्हाण यांच्या अंगावर उडी मारून त्यांच्यावर हल्ला केला. या झटापटीमध्ये त्यांच्या अंगाला गंभीर जखमा झाल्या आहेत तसेच इतरही कर्मचारी जखमी झाल्याने खळबळ उडाली आहे.
या सर्व कर्मचार्यांना सातार्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.