खरीप हंगामासाठी सातारा जिल्ह्याची तयारी पूर्ण


व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घेतला आढावा

स्थैर्य, सातारा दि. 21 : राज्यस्तरीय खरीप हंगाम 2020 आढावा बैठक आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आज पार पडली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 चे नियोजन आणि जिल्ह्या जिल्यातील  संभाव्य अडचणी जाणून त्यावर मार्ग काढण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या.

या व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पार पडलेल्या खरीप हंगाम बैठकीस राज्याचे सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री  (ग्रामीण) तथा वाशीमचे पालकमंत्री  शंभूराज देसाई,  जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती मंगेश धुमाळ, जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर आदी उपस्थित होते.

व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठकारे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी विविध जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांशी  संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,  या बैठकीत  पालकमंत्र्यांनी  सूचना केल्या, या सूचना चांगल्या असून यावर कृषी व सहकार विभागाला उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येतील, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले आपल्या सरकारला ६ महिने पूर्ण होत आहेत. राज्य शासनाकडून एक चांगला अर्थसंकल्प मांडण्यात आला पण आज कोरोनाच्या संकटामुळे आज देशाची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.

अन्न धान्याच्या दृष्टीने बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यात पुढील काळात काय करू शकतो ते पाहण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, कोरोना नंतर जग बदलणार आहे, त्यात कृषी क्षेत्राची महत्वाची भूमिका राहणार आहे. शेतकऱ्यांनी घेतलेल्या दर्जेदार पिकांची बाहेरच्या देशात निर्यात कशी होईल यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत. शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2020 मध्ये पिक कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी रिझर्व्ह बँकेकडे सातत्याने पाठपुरावा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सातारा जिल्ह्यातील खरीप हंगाम 2020 चे नियोजन पूर्ण झाले असून खरीप हंगाम 2020 साठी 102923 मे. टन एवढ्या खतांचे आवंटन जिल्ह्यासाठी मंजूर आहे. त्यापैकी माहे मे 2020 अखेर 30300 मे. टन इतका पुरवठा झालेला आहे. मागील शिल्लक मिळून एकूण 65250 मे. टन खत उपलब्ध आहे.

जिल्ह्याची 47804 क्विंटल बियाण्यांची मागणी  असून प्रमुख पिक सोयाबीनची मागणी  17063 क्विंटल इतकी आहे. त्यापैकी आजअखेर महाबीज कडून 1909.8 क्विंटल व खासगी कंपन्यांकडून 5119.73 क्विंटल असे एकूण 7029.53 क्विंटल इतकी बियाणे उपलब्ध झालेले आहेत. त्यापैकी 522 क्विंटल बियाण्यांची विक्री झालेली असून 6507.13 क्विंटल बियाणे विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात  आली आहे.

भात पिकाचे बियाण्यांची मागणी 13000 क्विंटल इतकी आहे. यापैकी महाबीजकडून 961, एनएससी-110 क्विंटल, खासगी 3812.99 क्विंटल असे एकूण 4883.99 क्विंटल बियाणे उपलब्ध झालेले आहे.  तसेच कृषी विभागामार्फत बांधावर खत व बियाणे वाटप मोहिमेंतर्गत सातारा जिल्ह्यात 812 शेतकरी गटांमार्फत आजअखेर 917.42 मे. टन खते व 888.16 क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!