साताऱ्यात जिल्हा रुग्णालयाचा भोंगळ कारभार; मृतदेहांची अदलाबदल


 सातारा जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. ३१ मार्च : सातारा जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दोन मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असतानाच ही चूक उघडकीस आल्याने नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत रुग्णालयात गोंधळ घातला.

दोन रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू

वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील आनंद सुनील ओव्हाळ (वय २६) आणि वडूज तर्फ आरळे येथील सुरेश मस्कु खोमणे (वय ५१) या दोघांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रात्री शवविच्छेदन झाल्यानंतर सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देताना हा गंभीर प्रकार घडला.

चेहरा न दाखवल्याचा नातेवाईकांचा आरोप

नातेवाईकांनी केलेल्या आरोपानुसार, मृतदेह ताब्यात देताना कर्मचाऱ्यांनी चेहरा दाखवला नाही. फक्त नावाचे लेबल दाखवून मृतदेह थेट रुग्णवाहिकेत ठेवला. ओव्हाळ यांच्या नातेवाईकांनी घरी गेल्यानंतर मृतदेहाचा चेहरा पाहिला असता, तो त्यांच्या नातेवाईकाचा नसल्याचे उघडकीस आले. त्यानंतर त्यांनी तातडीने रुग्णवाहिका पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणली.

पेटवलेली चिता तातडीने विझवली

दुसरीकडे, आनंद ओव्हाळ यांचा मृतदेह आरळे येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता. तिथे अंत्यसंस्काराची तयारी पूर्ण होऊन चिता पेटवण्यातही आली होती. मात्र, रुग्णालयातील चूक लक्षात येताच पेटवलेली चिता तातडीने विझवण्यात आली. या धक्कादायक प्रकारामुळे दोन्ही कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

रुग्णालय प्रशासनावर वाढता अविश्वास

संतप्त नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेत गोंधळ घातला आणि दोषी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाईची मागणी केली. एकाच महिन्यात मृतदेह अदलाबदलीची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीच्या अर्भक मृत्यू प्रकरणीही रुग्णालयाची चौकशी सुरू आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, सर्वसामान्यांनी शासकीय रुग्णालयांवर कसा विश्वास ठेवायचा, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


Back to top button
Don`t copy text!