दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार ग्रामपंचायतीचा कायापालट करून महाराष्ट्र राज्यातच नव्हे तर देशभर हिवरे बाजाराचा नावलौकिक करणारे पद्मश्री पोपटराव बागूजी पवार यांनी नुकतेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, संचालक दत्तात्रय ढमाळ, प्रदीप विधाते, राजेश पाटील, सौ. कांचन साळुंखे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे यांनी पोपटराव पवार यांचा शाल, पेढे व बुके देवून सत्कार केला.
कृषि व ग्रामीण अर्थ व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी व सहकार समृध्दी करण्यासाठी सातारा जिल्हा बँक कायमच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. बँकेचे आदर्शवत कामकाज हे इतर सहकारी बँकांना मार्गदर्शक ठरत असल्याचे गौरवोद्गार यावेळी पोपटराव पवार यांनी बँकेस दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी काढले. सातारा जिल्हा बँकेचा, देशामध्ये गौरवशाली परंपरा व बँकिंग क्षेत्रामध्ये आदर्श बँक म्हणून त्यांनी विशेष उल्लेख केला. बँकेने कार्यान्वित केलेल्या विविध योजनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास व त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी जिल्ह्यातील शेतकरी सभासदांच्या कल्याणासाठी तसेच जिल्ह्यातील शेतकरी सभासदांचे जीवनमान उंचावणेसाठी बँकेच्या माध्यमातून विविध योजना व कामकाजात नाविन्यपुर्णता ठेवत त्यांनी बँकेला लौकिक प्राप्त करून दिला आहे. यापुढील काळातही ही बँक उत्तरोत्तर प्रगती पथावर रहावी, ही शुभकामना यावेळी त्यांनी व्यक्त केली.
यावेळी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील म्हणाले, आज हिवरे बाजार पूर्णतः दुष्काळमुक्त झाले असून या राज्यात हिवरे बाजार पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच त्यांनी पाणी फाऊंडेशनमध्ये देखील सहभाग घेतला. पाणी आणि स्वच्छता यापुरतंच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केलं आहे. पोपटराव पवार यांनी आमच्या बँकेला दिलेली भेट ही अभिमानास्पद आहे.
दत्तानाना ढमाळ म्हणाले, पोपटराव पवार यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झालं आहे. १९८९ साली हिवरे बाजार येथील पहिले तरुण सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर गावातील जल संधारण, मृद संधारण आणि वनसंधारण या कामामध्ये स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला.
डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, पोपटराव पवार हे गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण झालेले नागरिक होते. १९८९ साली गावाचे सरपंच झालेनंतर त्यांनी गावात लोकोपयोगी कामे केली. त्यांच्या कामामुळे गावाचं रुप पालटलं. दुष्काळी भागात पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी जलसंधारणाचे नियोजन त्यांनी केले. त्यांच्या सर्वांगीण कामकाजाची दाखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनामार्फत पद्मश्री पुरस्काराने गौराविणेत आले.