सातारा जिल्हा बँक निवडणूक : शंभूराज देसाई शरद पवारांच्या भेटीला

दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑगस्ट २०२६ | मुंबई |
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे वारे आता मुंबईत पोहोचले आहेत. बँकेचे पहिले अध्यक्ष लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचे नातू आणि राज्याचे पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी पहिल्यांदाच ‘सिल्व्हर ओक’वर पाऊल ठेवलं. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

लोकनेत्यांच्या नंतर दीर्घकाळाने शंभूराज देसाईंना जिल्हा बँकेत एन्ट्री करण्याची संधी आली आहे. पाटण तालुका सोसायटी मतदारसंघातून त्यांनी जोरदार तयारी केली आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र सत्यजितसिंह पाटणकर हे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपवासी झाल्यानंतर शंभूराज देसाईंनी ‘सिल्व्हर ओक’वर जाणे, ही राजकीय वर्तुळात मोठी घडामोड मानली जात आहे.

महायुतीच्या सरकारमध्ये पर्यटन मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंनी गुरुवारी शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ही सदिच्छा भेट होती, असं म्हटलं जात असलं तरी सातारा जिल्ह्यात सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजत असल्याने ही भेट मोसमी होती, हे उघडच आहे. या भेटीत शंभूराज देसाईंनी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जीवनावरील ’दौलत’ हे पुस्तक शरद पवार यांना भेट दिले.

या भेटीबद्दल शंभूराज देसाईंनी आपल्या भावना व्यक्त करताना, ‘पवार साहेबांनी लोकनेत्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा म्हणजे माझ्यासाठी केवळ संवाद नव्हता, तर एका समृद्ध राजकीय परंपरेचा आणि जिव्हाळ्याच्या नात्याचा अनुभव होता’, असे म्हटले आहे.

Back to top button
Don`t copy text!