दैनिक स्थैर्य | दि. 01 जुलै 2024 | फलटण | संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व सोयी उभारण्यात आल्या आहेत. या पालखी सोहळ्याच्या तयारीची पाहणी आज जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य अधिकारी क्रांती बोराटे, सहायक पशुसंवर्धन आयुक्त विजय पवार यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.
पालखी मार्गावर वारकऱ्यांसाठी सर्व चांगल्या सुविधा उभारण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी म्हणाले, सुविधा कोठे उपलब्ध आहेत याची माहिती देणारे फलक तसेच डिजिटल स्क्रीन सर्व ठिकाणी लावाव्यात. तसेच पालखी मार्गावरील सर्व हॉटेल व मंगलकर्यालय येथील शौचालये वारकऱ्यांसाठी खुली ठेवण्याचे आदेश देण्यात यावेत. पालखी मार्गावरील प्रत्येक गावात शौचालय बांधण्यासाठी जागा निश्चित करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री डूडी यांनी लोणंद, निरा स्नान, तरडगाव, फलटण या ठिकाणच्या पालखी तळांची पाहणी केली.