पर्यावरणाच्या आणि कुटुंबाच्या हितासाठी नागरिकांनी ‘पीएनजी’ गॅस जोडणीला प्राधान्य द्यावे: जिल्हाधिकारी संतोष पाटील


सातारा जिल्ह्यात पीएनजी (PNG) गॅसचे जाळे विस्तारले जात असून, जागतिक ऊर्जा संकट आणि एलपीजीवरील मर्यादा पाहता नागरिकांनी सुरक्षित व स्वस्त अशा पीएनजी जोडणीला प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

 स्थैर्य, सातारा, दि. २ एप्रिल : सातारा जिल्ह्यात पीएनजी (Piped Natural Gas) गॅसचे जाळे वेगाने विस्तारले जात आहे. वाढते जागतिक ऊर्जा संकट आणि एलपीजीच्या उपलब्धतेवर आलेल्या मर्यादा पाहता, सर्व नागरिकांनी आपल्या कुटुंबाच्या आणि पर्यावरणाच्या हितासाठी पीएनजी गॅस जोडणीस प्राधान्य द्यावे, असे आवाहन सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.

जोडणीसाठी अर्ज कुठे मिळतील?

पीएनजी जोडणीसाठी आवश्यक असणारे अर्ज जिल्हा पुरवठा कार्यालय तसेच तहसील कार्यालयांमध्ये (पुरवठा विभाग) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी अधिक माहितीसाठी आणि नोंदणीसाठी आपल्या जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

पीएनजीकडे वळण्याची गरज का?

सद्यस्थितीत सुरू असलेल्या जागतिक भू-राजकीय घडामोडींमुळे वैश्विक ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. याचा परिणाम देशातील पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर झाला असून एलपीजी (LPG) गॅसच्या उपलब्धतेवरही मर्यादा आल्या आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी भारत सरकारने पाईपद्वारे गॅस जोडण्यांचा (पीएनजी) वेगवान विस्तार करण्याचे निर्देश दिले आहेत. आयात केलेल्या एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक वायूचा वापर वाढवणे हे देशाच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे.

सातारा जिल्ह्यातील पीएनजीची सद्यस्थिती

सध्या सातारा जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडद्वारे (BPCL) पीएनजीचे जाळे विस्तारले जात आहे. कराड तालुक्यातील मलकापूर नगरपंचायत हद्द आणि कोयना वसाहत येथे ९,६०० घरगुती वापराच्या पीएनजी जोडण्या करण्यात आल्या असून, यापैकी सुमारे १००० हून अधिक कुटुंबे पाईपलाईनद्वारे गॅसचा वापर करत आहेत. याशिवाय, सातारा शहरालगतच्या महामार्ग परिसरातील खेड, खिंडवाडी, आणि धनगरवाडी भागात सुमारे १२,००० मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.

पीएनजी गॅस वापराचे मुख्य फायदे :

  • २४ तास उपलब्धता : सिलिंडर बुकिंग करण्याची किंवा गॅस अचानक संपण्याची कोणतीही भीती नाही. पाईपलाईनद्वारे २४ तास गॅस उपलब्ध राहतो.

  • आर्थिक बचत : पीएनजी हा नैसर्गिक वायू स्थानिक स्रोतांशी जोडलेला असल्याने त्याच्या किमती स्थिर राहतात. तसेच, जेवढा वापर, तेवढेच बिल अशी मीटर रीडिंगनुसार बिलिंगची सुविधा असल्याने सामान्य नागरिकांचे बजेट कोलमडत नाही.

  • सुरक्षितता : हा नैसर्गिक गॅस हवेपेक्षा हलका असतो. त्यामुळे गळती झाल्यास तो लगेच विरून जातो आणि आगीचा धोका अत्यंत कमी असतो.

व्यावसायिक ग्राहकांसाठी शासनाचे कडक निर्देश

शासनाने राज्यभरात शहर गॅस वितरण नेटवर्क विस्तारण्याचे धोरण आखले आहे. त्यानुसार, सर्व व्यापारी आणि औद्योगिक एलपीजी ग्राहकांना त्यांच्या एकूण ५०% वाटपातून एलपीजी मिळण्यासाठी पात्र होण्यापूर्वी, पाईपने गॅस वितरणाकरिता संबंधित संस्थेकडे अर्ज करणे आणि सज्जता स्थिती प्राप्त करणे शासनाने बंधनकारक केले आहे.


Back to top button
Don`t copy text!