दैनिक स्थैर्य | दि. २ जून २०२३ | सातारा | सातारा शहराला व जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. हा वारसा जपण्याचे काम सर्वांनी करावे असे प्रतिपादन राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
शहरातील गांधी मैदान येथे श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समिती आणि नगर पालिका सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित पोवाडा सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री देसाई बोलत होते. यावेळी सातारा नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, श्री शिवराज्याभिषेक दिन उत्सव समितीचे अध्यक्ष सूर्यकांत गोरे, स्वागताध्यक्ष विनोद कुलकर्णी, कार्याध्यक्ष हरीष पाटणे, उपाध्यक्ष अमोल मोहिते आदी उपस्थित होते.
३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त समिती चांगले उपक्रम घेत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शासनाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित किल्ले रायगड येथे दिमाखदार शिवराज्यभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासास उजाळा देण्याचे काम करत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक वस्तूंचे जतन व्हावे. तसेच राजधानी सातारा येथील ऐतिहासिक राजवाड्याचे जतन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यासाठी शासन स्तरावरून निधीही दिला जाईल.
यावेळी शाहीर देवानंद माळी व त्यांच्या सहकलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सदर केला. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.