दैनिक स्थैर्य । दि. १० डिसेंबर २०२१ । फलटण । फलटण येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी चेस्टा मस्करीमध्ये केलेल्या विधानाचा विपर्यास झाला आहे. भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व सातारा हे एक वेगळेच समीकरण आहे, आणि आगामी काळामध्ये सुद्धा तेच समीकरण बरकरार राहील. सातारा लोकसभा मतदारसंघामधून श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी देण्यात यावी. भारतीय जनता पार्टीला जर खासदारकीसाठी माझा पुन्हा विचार करायचा असेल तर तो माढा लोकसभा मतदारसंघासाठीच करावा, असे मत माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व मी हे जवळचे मित्र आहोत. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची जागा मी कधीही घेवू शकत नाही. विक्रम पावसकर यांनी केलेल्या विधानाने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना दुखावण्याचा हेतू किंचतही नव्हता व आगामी काळामध्ये सुद्धा नसेल. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे अतिशय दिलखुलास व्यक्तिमत्व असून त्यांचा स्वभाव सुद्धा दिलदार आहे, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे माझ्या पाठीशी कायमच ठामपणे उभे आहेत. मी केलेल्या कोणत्याही संघर्षात मग अगदी तो नीरा देवधरचा संघर्ष असला तरी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे माझ्या पाठीशी उभे राहून संघर्षात मागे पुढे सुद्धा त्यांनी त्यावेळस बघितले नाही. आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनीच सातारा मतदारसंघातूनच निवडणूक लढवावी. भारतीय जनता पार्टीला जर पुन्हा मला संधी द्यायची असेल तर त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधून संधी द्यावी, असेही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी स्पष्ट केले.