
बदलत्या हवामानामुळे यंदा उशिराने फळांचा राजा ‘हापूस’ सातारा शहरात दाखल झाला आहे. उत्पादनात घट झाल्याने आंब्याचे दर हजार ते पंधराशे रुपये डझनावर पोहोचले आहेत.
स्थैर्य, सातारा, दि. ३० मार्च : बदलत्या हवामानामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे गेले महिनाभर प्रतीक्षा करायला लावलेला फळांचा राजा ‘हापूस’ आंबा अखेर सातारा शहरात दाखल झाला आहे. रत्नागिरी, पावस आणि देवगड परिसरातून हापूस आंब्याची मोठी आवक सुरू झाली असली तरी, यंदा दर चढे असल्याने खवय्यांना खरेदीसाठी विचार करावा लागत आहे.
डझनाचा दर पंधराशे रुपयांवर
सध्या बाजारात हापूस आंब्याचे दर १,००० ते १,५०० रुपये प्रति डझन इतके आहेत. यावर्षी आंब्याचे उत्पादन कमी असल्याने बाजारात हे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. सामान्य खवय्यांसाठी हे दर जास्त असल्याने, त्यांना आंबा खरेदीसाठी आणखी काही काळ आणि दर कमी होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
प्रतापगंज पेठेत आंब्यांची आवक
सातारा शहरातील प्रतापगंज पेठ परिसरातील बेंद्रे यांच्या आंबा विक्री केंद्रावर हे सुरेख आंबे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. वाढते दर असले तरी आंब्याची चव चाखण्यासाठी काही खवय्ये आवर्जून खरेदी करत असल्याचे चित्र आहे. (छायाचित्र : अतुल देशपांडे)

