दैनिक स्थैर्य । दि. १२ एप्रिल २०२३ । मुंबई । मुंबईत भाऊचा धक्का आणि ससून डॉक प्रमुख मच्छिमार बंदरे आहेत. येत्या वर्षभरात ससून डॉकच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
ससून डॉक विकासासंदर्भातील बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्य व्यवसाय मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव अतुल पाटणे, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पंकज कुमार आदी उपस्थित होते.
मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, मच्छिमारांच्या सुविधांसाठी मिरकरवाडा, भाऊचा धक्का आणि ससून डॉक हे तीन बंदरे विकसित करण्यात येत आहेत. मत्स्य उत्पादन, विक्रीसाठी मच्छीमार बांधवांना हक्काच्या बाजारपेठेसाठी पालघर जिल्ह्यातील सातपाटी येथे सर्व सुविधायुक्त आदर्श मच्छी बाजारपेठ उभारली जाणार आहे. ससून डॉकचे आधुनिकीकरण करुन सर्व वितरण सुविधा वर्षभरात उपलब्ध करण्यात येतील.
ससून डॉक प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ 5.39 हेक्टर असून याबाबत सुधारित विकास आराखडा तयार करण्यात आला असून याअंतर्गत वेगवेगळी 31 प्रकारची कामे करण्यात येणार आहेत. ससून डॉक येथे आता 1 हजार 669 कार्यरत नौका, तर 11 हजार 838 मच्छिमार असून या सर्वांना सोयीसुविधा मिळतील याकडे लक्ष देण्यात येणार अल्स्याचे मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.
ससून डॉक येथे नवीन मत्स्य लिलाव आणि मत्स्य हाताळणी केंद्र, जाळी विणकाम गृह, ॲप्रोच रोड तसेच रस्ते काँक्रीट आच्छादनासह रस्त्यांची सुधारणा, बर्फ कारखाना, मल:निस्सारण/ विषारी कचरा संकलन केंद्र, कचरा कुंड्या, सुरक्षा भिंत, मासळी हाताळणी यंत्रणा, हवा हाताळणी यंत्रणा, सध्या असलेल्या इमारतींचे आधुनिकीकरण, मच्छिमारांकरिता विश्रांतीगृह, महिलांकरिता विश्रांतीगृह, सुरक्षारक्षक गृह, व्हिक्टोरिया बेसिनचा गाळ उपसणे, मत्स्य बंदरावर सीसीटीव्ही निगराणी, प्रसाधनगृहांचे नूतनीकरण, रेडिओ कम्युनिकेशन टॉवर साहित्यांसहित, विद्युत पुरवठा व वितरण व्यवस्था, पाणीपुरवठा जलवाहिनी, पंप हाऊस, भूमीगत पाण्याची टाकी, शुध्द पाणी आणि इंधन पुरवठा, अग्निशमन उपकरणे, जेट्टीचे सक्षमीकरण, स्लीप वे अशी कामे करण्यात येणार आहेत.