
स्थैर्य, विडणी, दि. १४ ऑगस्ट : विडणी (ता. फलटण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्यानगरच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा उद्या, दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे. विडणीचे सरपंच सागर अभंग यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्यामुळे शाळेचा हा कायापालट शक्य झाला आहे.
यावेळी शाळेच्या नवीन इमारतीसोबतच, विद्यार्थ्यांसाठी बसवण्यात आलेले इंटरॲक्टिव्ह पॅनेल बोर्ड, सौर ऊर्जा युनिट, वॉटर प्युरिफायर, कुलर आणि हँड वॉश स्टेशन या सुविधांचेही लोकार्पण केले जाणार आहे. यामुळे शाळेला आधुनिक आणि डिजिटल स्वरूप प्राप्त झाले आहे.
सकाळी ८ वाजता होणाऱ्या या लोकार्पण सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सरपंच सागर अभंग, मुख्याध्यापक राजाराम तांबे, शालेय व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आले आहे.