दैनिक स्थैर्य । दि. २८ जुलै २०२२ । म्हसवड । म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील माळशिरस रोडवर गाडेकर वस्ती नजिक मुंबई येथील सोने चांदीचे व्यापारी अकलूज येथे त्यांच्या चार चाकी गाडीतून निघाले असताना साडेपाचच्या दरम्यान दोन अज्ञात मोटार सायकलस्वारांनी पिस्टलचा धाक दाखवून 15 ते 20 लाखाचे सोने चोरुन नेल्याची घटना घडल्याने म्हसवड परिसरात व्यापारी वर्गात कमालीची भिती पसरली आहे.
मुंबई येथील कुमावत नावाचे सोने चांदीचे व्यापारी चारचाकी वाहनातून अकलूज येथील त्यांच्या पेढीमध्ये निघाले होते. म्हसवडवरुन माळशिरस रोडने अकलूजला निघाले असताना सांयकाळी साडेपाचच्या दरम्यान गाडेकर वस्ती नजिक दोन मोटारसायकलींवरुन चौघे आले. एक मोटारसायकल चारचाकीला आडवी मारुन चार चाकी उभी केली व दुसर्या मोटारसायकलींवरील एकाने आपल्या जवळील पिस्टलचा धाक दाखवून कुमावत यांच्या जवळील 15 ते 20 लाखांचे किमतीचे दागिने घेवून चोरट्यांनी पोबारा केला. या घटनेची माहिती म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि बाजीराव ढेकळे व कर्मचारी यांनी माळशिरस परिसरापर्यंत परिसरत त्या चोरट्याचा तपास रात्री आठ वाजे पर्यंत सुरु होता तर या घटनेचा गुन्हा रात्री उशिरापर्यंत दाखल करण्याचे काम सुरू होते.