‘संतोषगड’ हा फलटण तालुक्यातील ताथवडा गावातील किल्ला आहे. यालाच ‘ताथवड्याचा किल्ला’ असेही म्हणले जाते. या संतोषगडाची उंची सुमारे २९०० फूट एवढी असून हा गिरीदुर्ग प्रकारात मोडणारा किल्ला आहे.
हा किल्ला फलटणपासून १९ किलोमीटर अंतरावर आहे. हा गड तीन भागात विभागला आहे. पहिल्या टप्प्यावर संरक्षक तटबंदी आहे तर दुसर्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा भाग बालेकिल्ल्याचा आहे.
किल्ला आकाराने छोटा आहे पण तटबंदी, बुरुज यासह बरेच काही बघण्यासारखे आहे. किल्ल्याच्या पश्चिमेस ताथवडा घाट तर दक्षिण पूर्व बाजूस सीताबाईचा डोंगर व वारुगड आहे.
ताथवडे गावात बालसिध्द नाथाचे जीर्णोद्धार केलेले मंदिर आहे. मंदिराच्या पायरीवर लिहिलेल्या आकडेवारीवरून १७६२ साली किल्ल्याचा जीर्णोद्धार केला असल्याचे दिसून येते.
किल्ला वर चढताना रस्त्यात एक मठ आहे. या मठाच्या बाजूला एक गुहा आहे. या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. तिथेच वाल्मिकी ऋषींची मूर्ती सुद्धा आहे. मठाच्या वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच जाते. तिथून पुढे गेल्या वर वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते.
तिथून वर थोडे उजवीकडे गेल्यानंतर जाणारा रस्ता आपल्याला थेट किल्ल्याच्या दारातच घेऊन जातो. दरवाजातून आत गेल्यावर समोरच मारुतीचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्याचे आणि घराचे अवशेष आहेत. धान्य कोठाराच्या भिंती व्यवस्थित आहेत, पण छप्पर तुटलेले आहे. याच्याच पाठीमागे खाली पाण्याचे टाक आहे. आणि टाक्यात उतरण्यासाठी काळभिंतीला जोडून पायर्या केलेल्या आहेत. किल्लाची संरक्षक तटबंदी आणि बुरुज आजही चांगल्या स्थितीत आहे.
विजापूरहून होणार्या स्वार्यांना पायाबंद बसावा तसेच स्वराज्याची बाजू बळकट असावी यासाठी शिवाजी महाराजांनी संतोषगड आणि वारुगड या गडांची डागडुजी केली. दोन्ही गडावरून प्रचंड मोठा मैदानी प्रदेश दिसतो. ताथवडे गावात सिद्धनाथाचे खूप मोठे मंदिर बांधलेले आहे.
या किल्ल्याला भेट देण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात यावे. किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट आहे. महादेव डोंगररांगेतील एका टेकडीवर हा किल्ला आहे. याच रांगेत संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत.
शिवमंदिरातील पिंडीवर शाळुंखेत चौमुखी शिव कोरलेले आहेत. बालसिध्द म्हणजे शंकर अर्थात अष्टभैरवापैकी एक. त्याची मूर्ती शैवपंथीयांच्या संकेतानुसार आहे. दर चैत्र वद्य अष्टमीला येथे यात्रा भरते.
बालसिध्दाचे दर्शन घेऊन मी गडाकडे निघालो. ताथवडा गावातून सोपी पायवाट गडावर घेऊन जाते. सध्या या वाटेवर सह्याद्रीत आढळणार्या वेगवेगळ्या पक्षांचे फलक लावले आहेत. तसा संतोषगड हा बेलाग, बुलंद, राकट, कणखर वैगेरे टिपिकल सह्याद्रीच्या विशेषणांच्या खात्यात जमा न होणारा होता. त्रिकोणी आकाराचा हा गड तीन टप्प्यांचा बनलेला आहे. पहिल्या टप्प्यावर सरंक्षक तटबंदी तर दुसर्या टप्प्यावर माचीचा भाग आणि सर्वात वरचा बालेकिल्ल्याचा भाग आहे. मठाच्या पुढे तीन गुंफा आहेत. वाटेवरून चालत गेलो असता, मी एका मानवनिर्मित गुहेजवळ जाऊन पोहोचलो. ही गुहा म्हणजे एक खांबटाक आहे. सुरुवातीच्या दोन खांबांवर द्वारपाल कोरलेले आहेत. आत गेल्यावर खोली वाढत गेली. खाली जायला कोरलेल्या पायर्या आढळून आल्या. सध्या गुहेमध्ये गणपतीची मूर्ती आणि शिवलिंग ठेवलेले आहे. पाणी मात्र नाही.
गुहा बाजूला ठेवून पुन्हा मुख्य पायवाटेला आलो आणि दोन मिनिटात एका आश्रमापाशी पोहोचलो. येथील माताजी दत्ताच्या भक्त असून सुमारे चाळीस वर्षांपासून येथे राहत आहेत, अशी माहिती मिळाली. आश्रमामध्ये महिषासुरमर्दिनीची सुंदर मूर्ती आहे. आश्रमाजवळ एक छोटे मंदिर आहे, जेथे दत्त व लक्ष्मी मातेच्या प्रतिमा ठेवल्या आहेत.
मठाच्याच वरच्या बाजूला एक दरवाजा आहे. मात्र येथपर्यंत पोहोचण्यासाठी वळसा घालून यावे लागते. मठाच्या डाव्या बाजूला जाणारी वाट तटबंदीला चिटकूनच पुढे जाते. पुढे वाटेतच एक छोटेसे देऊळ लागते. देवळातील या मूर्तीला वाल्मिकीची मूर्ती समजतात. येथून वर थोडी उजवीकडे सरकत जाणारी वाट आपल्याला थेट किल्ल्याच्या दरवाजातच घेऊन जाते. आश्रमाकडून पुन्हा काही पावले मागे आलो आणि डावीकडे वर जाणारी पायवाट पकडली. इथे किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे दर्शन झाले. येथील बुरुज ढासळले आहेत. अलीकडेपर्यंत दरवाजाचा बराचसा भाग हा मातीखाली गडाला गेलेला होता; परंतु पुण्यातील शिवसह्याद्री संस्थेच्या कामातून हा दरवाजा पुन्हा आणला गेला आहे. या दरवाजाच्या आधी उजव्या बाजूला तटबंदीत ही कमान दिसते.
दरवाजातून पुढे चालत गेल्यावर माझा प्रवेश किल्ल्याच्या माचीवर झाला. येथील बालेकिल्ल्याची तटबंदी आणि ताशीव कडे दृष्टीस पडतात. माचीला सुद्धा तटबंदी आहे. ह्याची उंची अंदाजे वीस फूट आणि रुंदी पंधरा फुटांहून अधिक आहे. किल्ल्याची भौगोलिक रचना पाहता इतकी भव्य तटबंदी बांधायचा हेतू लक्षात येतो. किल्ल्याचा डोंगर चढायला अतिशय सोपा आहे. त्यामुळे शत्रू अगदी सहजपणे वर चढून येऊ शकतो. माचीवरील ही अभेद्य तटबंदी त्याला आत येण्यापासून रोखून ठेवू शकते. माचीवरून पायवाटेने पुढे गेल्यावर आपल्याला अजून एक दरवाजा लागला. ह्या दरवाजाची पडझड झाली आहे. येथून आत गेल्यावर बालेकिल्ल्याचा मुख्य दरवाजा लागला.
हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे. हा दरवाजा निश्चित्तच शिवकालात बांधला गेला असेल. दरवाजाचा बराचसा भाग अनेक वर्षे जमिनीखाली गाडला गेला होता. शिवसह्याद्री संस्थेमार्फत मुरुम, माती बाजूला करून दरवाजा बाहेर काढण्यात आला आहे. दरवाजाचे चौकोनी दगड, ते एकमेकांवर चिकटवण्यासाठी वापरलेल्या चुन्याच्या रेषा स्पष्ट दिसतात. दरवाजातून आत प्रवेश केल्यावर सुस्थितीत असलेल्या पहारेकर्यांच्या देवड्या दृष्टीस पडल्या. बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला मारुती आणि गणपतीचे भग्न अवस्थेतील मंदिर आहे. दरवाजातून आत शिरल्यावर समोरच हनुमानाचे टाके आहे. त्याच्याच मागे वाड्यांचे व घरांचे अवशेष आहेत. प्रचंड मोठी विहीर आणि तातोबा महादेवाचे मंदिर पहाण्यासाठी. धान्यकोठाराच्या मागच्या बाजूस प्रचंड मोठं विहीरवजा टाकं आहे. टाक्यात खाली वाकून बघताना भीती वाटते. ह्या चौरसाकृती टाक्याची लांबी-रुंदी साधारण तीस फूट, तर खोली जवळपास पन्नास ते पंचावन्न फूट आहे. इतकं मोठं खोदीव टाकं यापूर्वी धुळ्याजवळच्या सोनगिर आणि संकेश्वर जवळच्या वल्लभगडावर पाहिले होते. टाक्यात पाणी नाही. माती आणि मुरुम ह्यामुळे ह्या टाक्याच्या बराचसा भाग बुजलेल्या अवस्थेत होता. शिवसह्याद्री संस्थेमार्फत मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्यात आला, त्यामुळे टाक्यांची खोली आठ ते दहा फूट वाढली. टाक्याची मूळ खोली अजूनही जास्ती असण्याची शक्यता आहे.
खाली उतरताना वाटेत शंकराचे छोटे देऊळ आहे. यालाच ‘तातोबा महादेव’ म्हणतात. याची एक कथा रहाळात सांगितली जाते. तातोबा नावाचा एक साधू या डोंगरावर राहत असे. त्याच्या ख्यातीमुळे रोजच भक्तांची गर्दी व्हायची. त्यामुळे त्याला साधनेला वेळ मिळत नसायचा. शेवटी कंटाळून त्याने या डोंगरावर एक विहीर बांधली आणि त्या विहिरीत तो राहू लागला. जेणेकरून लोकांना आपण कुठे आहोत याचा अंदाज येणार नाही. त्यामुळे त्याच्या दर्शनासाठी येणार्या लोकांना साधूबाबा अचानक कुठे गेले हेच कळेना. एक दिवस या डोंगरावर आलेल्या एका गुराख्याला प्रचंड तहान लागली. पण त्याला पाणी कुठे आहे हे, माहीत नव्हतं. अचानक त्याच्यासमोर हे तातोबा प्रकट झाले आणि आपल्या कमंडलूमधलं पाणी त्याला प्यायला दिलं आणि अचानक ते अंतर्धान पावले. चकित झालेल्या गुराख्याने आजूबाजूला शोध घेतल्यानंतर त्याला त्या विहिरीत एक शिवमंदिर आणि हे तातोबा दिसले. पुढे त्यांच्या भक्तांनी त्यांचं मंदिर गडावर बांधलं आणि त्यांचंच नाव पायथ्याच्या गावाला दिलं. तेव्हापासून या डोंगराला आणि त्याच्या पायथ्याच्या गावाला ‘ताथवडा’ असं म्हणू लागले.
पण सध्या शासनाने संतोषगडाची डागडुजी करून किल्ल्याला झळाळी द्यावी, अशी अपेक्षा फलटण तालुक्यातील जनतेसह किल्ला प्रेमीमधून होत आहे.
लेखन – निलेश सोनवलकर
मो. ९४०४६४३८१२