संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रेचा मंगळवारी सातारा जिल्ह्यात प्रवेश

फलटण येथील शिंपी समाज विठ्ठल मंदिर येथे पहिला मुक्काम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १० नोव्हेंबर २०२४ | फलटण |
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, नामदेव समाजोन्नती परिषद व समस्थ नामदेव शिंपी समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमान (पंजाब) या संत नामदेव महाराज रथ व सायकल यात्रा मंगळवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता साधुबुवाचा ओढा, राजुरी (ता. फलटण) येथे सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार असून सोहळा सायंकाळी फलटण मुक्कामी विसावणार असल्याची माहिती विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.

संत ज्ञानदेव व संत नामदेव महाराज यांनी १२ व्या शतकात उत्तर भारतात जाऊन श्री विठ्ठल भक्तीचा व भागवत धर्माचा प्रचार व प्रसार केला आहे. संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांची घुमान येथे वस्त्रसमाधी आहे. मुगलसम्राट मोहंमद तुघलक यांचे नातु फिरोजशा तुघलक यांनी घुमान येथे संत नामदेव महाराज यांचे भव्यदिव्य मंदिर उभारले आहे. हा विठ्ठलभक्तीचा व शांती, समता व बंधूता हा भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करण्यासाठी प्रतिवर्षी ही यात्रा काढली जाते. यात्रेचे हे तिसरे वर्ष असून महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा व पंजाब राज्यातून प्रवास करीत ही यात्रा सोमवार, दि. २ डिसेंबर रोजी चंदीगड, पंजाब येथे पोहोचणार आहे. पंजाबचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हे पंजाब राज्यात राजभवन येथे या यात्रेचे स्वागत करणार आहेत. ही यात्रा बुधवार, दि. ४ डिसेंबर रोजी श्री क्षेत्र घुमान येथे पोहोचेल.

राजुरी येथे सातारा जिल्ह्यातील नामदेव शिंपी समाजाच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून सायंकाळी सोहळा श्री विठ्ठल मंदिरात विसावणार आहे. सातारा जिल्ह्यातील सर्व नामदेव शिंपी समाज व भाविकांच्या वतीने यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. भाविक भक्तांनी संत नामदेव पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट, शिंपी समाज महिला मंडळ व फलटण नामदेव समाजोन्नती परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!