
स्थैर्य, फलटण, दि. १५ सप्टेंबर: संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या ७५५ व्या जयंती निमित्त, श्री क्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्री क्षेत्र घुमाण (पंजाब) या सुमारे २५०० किलोमीटरच्या ‘संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही सायकलवारी रविवार, दि. २ नोव्हेंबर रोजी पंढरपूरहून प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष सुभाष भांबुरे यांनी दिली.
भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी (घुमाण) आणि समस्त नामदेव शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने या वारीचे आयोजन करण्यात आले असून, हे वारीचे चौथे वर्ष आहे. ही रथयात्रा व सायकल वारी रविवार, दि. २ नोव्हेंबर ते दि. ३ डिसेंबर २०२५ या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्तिक शुद्ध एकादशी, संत ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि गुरुनानक जयंती याचे औचित्य साधून या वारीचा शुभारंभ होत आहे.
सुभाष भांबुरे यांनी सांगितले की, ही देशातील पहिली राष्ट्रीयस्तरावरील आध्यात्मिक सायकल वारी असून, या माध्यमातून भागवत धर्माच्या शांती, समता आणि बंधुता या विचारांचा प्रचार-प्रसार केला जातो. यात्रेत ५० पेक्षा जास्त वय असलेले आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सायकलिंगचा अनुभव असलेले ११० सायकलपटू सहभागी होणार आहेत.
यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेस भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, संत नामदेव महाराजांचे वंशज ज्ञानेश्वर माऊली नामदास, महाराष्ट्र राज्य समन्वयक बापूसाहेब उंडाळे, पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर टेमघरे, सचिव ॲड. विलास काटे, खजिनदार मनोज मांढरे, विश्वस्त राजेंद्रकृष्ण कापसे, राजेंद्र मारणे आणि सल्लागार डॉ. राजगोपाल खंडेलवाल आदी उपस्थित होते.