संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखीचे यंदा साताऱ्यात चार मुक्काम; ८ जुलैला आळंदीतून प्रस्थान


आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा ८ जुलैला आळंदीतून प्रस्थान ठेवणार आहे. यंदा सातारा जिल्ह्यात पालखीचे लोणंद, तरडगाव, फलटण आणि बरड असे चार मुक्काम असणार आहेत.

 स्थैर्य, सातारा, दि. ३१ मार्च : आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा यंदा बुधवार, ८ जुलै रोजी दुपारी ३ वाजता आळंदी येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. यावर्षी या भव्य पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात तब्बल चार मुक्काम असणार आहेत. २४ जुलै रोजी पालखी पंढरपूरला पोहोचेल आणि २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा साजरा होईल.

साताऱ्यातील पालखीचे मुक्काम

पालखी सोहळा १५ जुलै रोजी नीरा नदीकाठी स्नान करून सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल आणि पहिला मुक्काम लोणंद येथे असेल. त्यानंतर १६ जुलै रोजी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यातील पहिले उभे रिंगण पार पडेल आणि पालखी तरडगाव येथे मुक्कामासाठी येईल. १७ जुलैला फलटण येथे तर १८ जुलैला बरड येथे पालखी विसावेल. त्यानंतर १९ जुलै रोजी सोहळा सोलापूर जिल्ह्यात मार्गस्थ होईल.

१७ दिवसांचा प्रवास आणि रिंगण सोहळे

पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात आळंदी संस्थानची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पालखी सोहळाप्रमुख राजेंद्र उमाप यांनी यंदाचा कार्यक्रम जाहीर केला.

“यंदा पालखीचे प्रस्थान दुपारी ३ वाजता होणार आहे. आळंदी ते पंढरपूर या १७ दिवसांच्या पायी प्रवासात एकूण ४ गोल रिंगण आणि ३ उभे रिंगण पार पडणार आहेत,” अशी माहिती राजेंद्र उमाप यांनी दिली.

पालखी सोहळ्याचे संपूर्ण वेळापत्रक :

  • ८ जुलै : आळंदी येथून प्रस्थान (दुपारी ३ वा.)

  • ९ व १० जुलै : पुणे मुक्काम

  • ११ व १२ जुलै : सासवड मुक्काम

  • १३ जुलै : जेजुरी मुक्काम

  • १४ जुलै : वाल्हे मुक्काम

  • १५ जुलै : नीरा स्नान आणि लोणंद मुक्काम (सातारा जिल्ह्यात प्रवेश)

  • १६ जुलै : चांदोबाचा लिंब (पहिले उभे रिंगण) आणि तरडगाव मुक्काम

  • १७ जुलै : फलटण मुक्काम

  • १८ जुलै : बरड मुक्काम

  • १९ जुलै : सोलापूर जिल्ह्यात प्रवेश

  • २३ जुलै : बाजीराव विहीर (गोल आणि उभे रिंगण) व वाखरी मुक्काम

  • २४ जुलै : आषाढ दशमी (उभे रिंगण) आणि पंढरपूर मुक्काम

  • २५ जुलै : आषाढी एकादशी महासोहळा


Back to top button
Don`t copy text!