स्थैर्य, फलटण, दि. ०९ : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या माध्यमातून फलटण तालुक्यात असणाऱ्या २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये १६५ लिटर्सचे फ्रिज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सध्या फलटण तालुक्यामधील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. त्या मुळे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये लस व इतर औषधांचा साठा करण्यासाठी फ्रिजची आवश्यकता भासत होती. हे श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी त्वरित गोविंद मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्सच्या वतीने २१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये फ्रिज उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत, अशी माहिती फलटण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार यांनी दिली.
य यावेळी बोलताना पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे – पवार म्हणाल्या कि, सध्या कोरोनाचे रुग्ण फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने सापडत आहेत. त्या मुळे फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागामधील ४५ वर्षे पूर्ण केलेल्यांनी लसीकरण करून घ्यावे. सध्या कोरोनाला दोन हात करण्यासाठी लसीकरण हाच पर्याय समोर आहे. लसीकरण केले म्हणजे कोरोना होणार नाही असे नाही परंतु कोरोना विषाणू सोबत लढण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये तयार होते. या सोबतच तालुक्यातील सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग व वारंवार हात धुणे हे नियमित पणे चालू ठेवले पाहिजे.