अतिवृष्टीमुळे श्रीमंत संजीवराजेंचा एकसष्टीपूर्ती सोहळा स्थगित; ‘सरोज व्हीला’ या निवासस्थानी उपलब्ध नसणार


स्थैर्य, फलटण, दि. 4 ऑक्टोबर : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष आणि सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा नियोजित एकसष्टीपूर्ती (६१ वा वाढदिवस) सोहळा राज्यातील अतिवृष्टीच्या संकटामुळे स्थगित करण्यात आला आहे. तसेच, दि. ९ ऑक्टोबर रोजी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा स्वीकारण्यासाठी ते फलटण येथील ‘सरोज व्हीला’ या निवासस्थानी उपलब्ध नसतील, अशी माहिती माजी आमदार दीपक चव्हाण यांनी दिली आहे.

राज्यातील पूरग्रस्त शेतकरी आणि इतर समाज घटकांना मदत करणे हे सध्याचे प्राधान्य आहे. त्यामुळे वाढदिवसाचा सोहळा साजरा न करता मदत कार्यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. योग्य वेळी हा एकसष्टीपूर्ती सोहळा पुन्हा आयोजित केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

मतदार संघातून मदत संकलित करण्याचे आवाहन

दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण-कोरेगाव विधानसभा मतदार संघातून अतिवृष्टीग्रस्तांसाठी मदत संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. सहकारी संस्था, ग्रामपंचायती, सोसायट्या आणि नागरिकांनी वैयक्तिकरित्या जीवनावश्यक वस्तू, कपडे, धान्य, शैक्षणिक साहित्य या स्वरूपात जास्तीत जास्त मदत करावी, असे आवाहन माजी आमदार दीपक चव्हाण यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!