
स्थैर्य, सातारा, दि. 20 सप्टेंबर : महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कोरेगाव व मंडल कृषी अधिकारी कोरेगाव यांच्यावतीने मौजे सांगवी येथे राष्ट्रीय खाद्यतेल अभियान तेलबिया सोयाबीन व भुईमूग प्रमाणित बियाणे वितरण कार्यक्रम सन 2025-26 अंतर्गत पीक प्रात्यक्षिक व प्रशिक्षण शेतकर्यांसाठी आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी कृषी विज्ञान केंद्र बोरगाव येथील शास्त्रज्ञ भूषण यादगिरवार यांनी भुईमूग व सोयाबीन या पिकामध्ये नवीन वाणाच्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती, लागवड तंत्रज्ञान,एकात्मिक खत आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे ऊस,आले हळद व इतर भाजीपाला पिकाविषयी सखोल मार्गदर्शन त्यांनी केले.
शासनाने विचार करून शेतकर्यांना आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आयात निर्यात धोरणात सुधारणा केली आहे त्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल तेलबिया अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी तेलबिया उत्पादक शेतकर्यांसाठी प्रमाणित बियाणे वितरण पीक प्रात्यक्षिक शेतकरी प्रशिक्षण राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने कोरेगाव तालुक्यात सोयाबीनचे 80 हेक्टर क्षेत्रावर पीक प्रात्यक्षिक घेण्यात आले आहे व सोयाबीन प्रमाणित बियाणे वितरण 150 हेक्टर, भुईमूग प्रमाणित बियाणे वितरण 20 हेक्टर करण्यात आले आहे, असे तालुका कृषी अधिकारी श्री. ज्ञानदेव जाधव यांनी सांगितले.
राजेंद्र निकम यांच्या भुईमूग पीक प्रात्यक्षिक प्लॉटला सर्वांनी भेट दिली.तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत विशेष केळी लागवड केलेल्या शेतकर्यांच्या प्लॉटवर जाऊन केळी तंत्रज्ञान लागवड व व्यवस्थापन याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नंदकुमार निकम व प्रताप निकम यांच्या निशिगंध व शेवंती लागवड केलेल्या प्लॉटला भेट दिली.
कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक कृषी अधिकारी सतीश रणपिसे उप कृषी अधिकारी अर्जुन भोसले , सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे, प्रियंका गायकवाड उपस्थित होते.