प्रभाग ११ मधून भाजपचे संदीप चोरमले उमेदवारीसाठी इच्छुक; सामाजिक कार्याचा वारसा आणि दांडगा जनसंपर्क


स्थैर्य, फलटण, दि. ९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून (ओबीसी) भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष आणि प्रसिद्ध उद्योजक संदीप दौलतराव चोरमले यांनी उमेदवारीसाठी प्रबळ दावेदारी केली आहे. राजकीय आणि सामाजिक वारसा लाभलेल्या संदीप चोरमले यांचा प्रभागात दांडगा जनसंपर्क असल्याने त्यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे.

संदीप चोरमले यांना राजकारणाचा आणि समाजसेवेचा वारसा घरातूनच मिळाला आहे. त्यांच्या आई सौ. सुलोचना चोरमले यांनी उपनगराध्यक्षपद भूषवले आहे, तर वडील दौलतराव चोरमले यांनी महावितरणच्या माध्यमातून समाजसेवा करत २०० हून अधिक तरुणांना नोकरीसाठी मार्गदर्शन केले आहे.

संदीप चोरमले हे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत आणि विश्वासू सहकारी मानले जातात. गेल्या दोन वर्षांपासून ते भाजपचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून संघटनेत सक्रिय आहेत. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभागातील विविध भागांत हायमास्ट दिवे, रस्ते, गटारे, स्वच्छतागृहांची दुरुस्ती यांसारखी अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत.

गेल्या १६ वर्षांपासून ते राजमाता अहिल्यादेवी गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून रक्तदान, आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिरे, लहान मुलांसाठी स्पर्धा असे विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अन्नदान आणि मोफत चष्मे वाटपाचा त्यांचा उपक्रम विशेष उल्लेखनीय आहे.

‘होम मिनिस्टर – खेळ रंगला पैठणीचा’ या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करून त्यांनी तब्बल ७००० महिलांना पैठणी साडी आणि बक्षीसांचे वाटप केले होते, ज्याची शहरभर चर्चा झाली होती. कोरोना काळात गरजूंना अन्न, फळे वाटप, जनजागृती आणि लसीकरण कॅम्पचे आयोजन करून त्यांनी आपल्या सामाजिक बांधीलकीचा परिचय दिला.

शिवाजीनगर येथील मतिमंद मुलांच्या शाळेचे अध्यक्ष म्हणून ते सन २००० पासून सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देत आहेत. त्यांच्या या व्यापक सामाजिक आणि राजकीय कार्यामुळे प्रभाग ११ मधून भाजपच्या उमेदवारीसाठी ते प्रबळ दावेदार मानले जात आहेत.


Back to top button
Don`t copy text!