स्थैर्य, सातारा, दि.२९: सातारा विकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक प्रशांत आहेरराव यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशाप्रमाणे गुरूवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांना दुपारी दोन वाजता हा राजीनामा सादर करण्यात आला.
उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक असणार्या प्रशांत आहेर राव यांना अठरा महिन्यापूर्वी स्वीकृत नगरसेवक पदी नेमणूक देण्यात आली होती. सातारा विकास आघाडीच्या प्रत्येक उपक्रमात आहेरराव यांचा उत्स्फूर्त सहभाग असायचा. कोरोनाच्या काळातही विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना प्रचंड मदत केली. मात्र, सध्या स्वीकृत व उपनगराध्यक्ष पदांच्या बदलाचा आग्रह उदयनराजे यांच्याकडे धरला जात होता. वर्षभरावर आगामी पालिका निवडणुका येउन ठेपल्या असल्याने मोर्चेबांधणीचा भाग म्हणून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचे उदयनराजे यांचे धोरण असते. गेल्या काही दिवसापूर्वीच उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी राजीनामा दिला. सातारा विकास आघाडी आपल्या स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा घेणार का? यांची राजकीय उत्सुकता होती. उदयनराजे यांनी आदेश दिल्याप्रमाणे गुरुवारी दुपारी प्रशांत आहेरराव आपले सहकारी निलेश महाडिक यांच्यासमवेत जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले. जिल्हाधिकारी शेखर सिंग यांच्याकडे आपला राजीनामा आहेरराव यांनी सादर केला. दीड वर्षाच्या कारकिर्दी विषयी आहेरराव यांनी समाधान व्यक्त केले. माची पेठेतील नागरिकांसाठी संरक्षक भिंत बांधून जीवनावश्यक सेवांसाठी कायमच पाठपुरावा केला. डोंगर भागात राहणार्या नागरिकांना रस्त्याची सोय उपलब्ध होणार आहे. आमच्या विचारांना आमचे आजोबा अप्पासाहेब आहेरराव यांच्या विचारांचा वारसा आहे. राजमाता कल्पनाराजे यांचा आशिर्वाद व खासदार उदयनराजे भोसले यांची प्रेरणा यामुळे जनतेच्या प्रश्नांशी कायमच आमची नाळ जोडली असल्याची प्रतिक्रिया प्रशांत आहेरराव यांनी दिली.
स्वीकृत नगरसेवक पदाचा कार्यक्रम येत्या दोन दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जाहीर केला जाणार आहे. तर आगामी स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष कोण होणार याचीही चर्चा जोरदार आहे. करंजेतील कट्टर उदयनराजे भोसले समर्थक बाळासाहेब ढेकणे यांना आगामी वर्षभरासाठी संधी दिली जाणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. तर उपनगराध्यक्ष पदासाठी नगरसेवक मनोज शेंडे यांचे नाव निश्चित असल्याचे सांगितले जात असल्याने करंजे पंचक्रोशीत आनंदाचे वातावरण आहे.