दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२२ । सातारा । संभाजीराजे हे छत्रपती असल्याने त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याचा आणि लढण्याचा अधिकार आहे. पण, त्यांनी भाजपसोबतच राहावे. त्याचा बहुजन मराठी समाजाला फायदा होईल. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याने ते निवडून येणार नाहीत, त्यामुळे त्यांनी निर्णय बदलून भाजपसोबतच राहावे, असे स्पष्ट मत रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री आठवले सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज त्यांनी शासकिय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कोणती भूमिका घ्यायची हा अधिकार संभाजीराजे यांना आहे कारण छत्रपती असल्याने ते निर्णय घेऊ शकतात. त्यांना स्वतंत्र लढण्याचा अधिकार आहे पण त्यांनी भाजपसोबत राहावे. काँग्रेस, राष्ट्रवादी सोबत जाऊन ते निवडून येणार नाहीत. त्यामुळे त्यांनी आपला निर्णय बदलावा. इंधन दरवाढ, महागाई हे विषय भाजपला आगामी निवडणुकीत अडचणीचे ठरणार का, यावर मंत्री आठवले म्हणाले, महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यासाठी सरकारने आणखी काही कर कमी केले पाहिजेत. केंद्राकडून राज्याला मिळणारे जीएसटीचे पैसे मिळावेत, यासाठी आम्ही अर्थमंत्री निर्मला सितारामण यांच्याशी बोलणार आहे.
राज्यात भाजपचे सरकार नाही म्हणून आम्ही महाराष्ट्रावर अन्याय होऊ देणार नाही. शरद पवारांनी साताऱ्यातील जकातवाडी येथील कार्यक्रमात सादर केलेल्या कवितेवरून भाजपने टीकेची झोड उठवली आहे. याविषयी विचारले असता आठवले म्हणाले, पवार साहेबांनी हिंदू नाराज होतील अशी कविता करू नये आणि भाजप नाराज होईल अशी कविता म्हणून नये, अशी मिश्किल टिपणी केली. आगामी लोकसभा निवडणूक मी शिर्डीतून लढावी, अशी राधाकृष्ण विखे पाटील यांची इच्छा आहे. त्यामुळे मी शिर्डीतून लढणार आहे. जोपर्यंत मोदी पंतप्रधान आहेत तोपर्यंत मला मंत्रिपद मिळणार आहे. तसेच भाजपमधील कोणीही पंतप्रधान झाला तरी मला मंत्रिपद मिळणार आहे.
देशातील दलित समाज भाजपसोबत आहे. रिपब्लिकन पक्षाला उत्तर प्रदेशात चांगली संधी आहे. मी लवकरच उत्तर प्रदेशाचा दौ करणार असून दौऱ्यात अनेकांशी भेटीगाठी होतील. तसेच आम्ही मुख्यमंत्री आदित्यनाथ यांची भेट मागितली आहे. रिपब्लिकन पक्ष हा चळवळीतून निर्माण झालेला पक्ष आहे आमच्या पक्षाला पॉलिटिकल इमेज नाही. भाजपसोबत जाऊन रिपब्लिकन पक्षाला मंत्रीपद मिळालेले आहे. भविष्यात रिपब्लिकन पक्षाला चांगले दिवस येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.