
दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
चायनीज मांजा फलटण शहरात खुलेआम विक्री होत असून चायनीज मांजाच्या विक्रीवर पूर्ण बंदी आणावी, अशी मागणी हिंदू समाज कृती समितीने फलटणच्या प्रांताधिकार्यांकडे केली आहे.
फलटण शहरात सध्या खुलेआम विक्री होणार्या चायनीज मांजाच्या विक्री विरोधात पोलिसांनी कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. मध्यंतरी नागरिकांनी निवेदन देऊन मोर्चा काढण्याचा इशारा देऊन सुद्धा याबाबत पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यामुळे शहरात सर्वच ठिकाणी चायनीज मांजाची सहजपणे विक्री केली जात आहे.
मागील वर्षी म्हणजे २०२३ मध्ये प्रशासनाने कडक निर्बंध घातले होते व काही प्रमाणात चायनीज मांजाचा वापर कमी झाला होता, पण तो पूर्णपणे बंद झाला नाही, यामुळे पुन्हा यावर प्रशासनाने कडक निर्बंध घालून चायनीज मांजा विक्री व वापर करणार्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सकल हिंदू समाज कृती समिती फलटण यांनी प्रांताधिकार्यांकडे केली आहे.