
सज्जनगड- गायन सादर करताना पंडित राम देशपांडे व गंधार देशपांडे. (छाया – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, 11 फेब्रुवारी, सातारा : सज्जनगड येथील भक्त निवासात गेले नऊ दिवस सुरू असलेल्या श्री समर्थ सेवा मंडळ ,सज्जनगड आयोजित दासनवमी संगीत महोत्सवात विविध कलाकारांनी गायन, वादन सादर केले .या महोत्सवात सुप्रसिद्ध गायक पंडित राम देशपांडे व गंधार देशपांडे यांनी अतिशय सुरेख असा आगळावेगळा राग आळवत ,रामरायाची भजने म्हणत या महोत्सवाची सांगता केली.
आपल्या गायन सेवेचा प्रारंभ पंडित राम देशपांडे यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील ..धानी.. या रागाने केला. हा राग स्वरांच्या शिवाय भीमपलास रागामध्ये वर्णित केला जातो .आणि विशेष करून हा राग लोकप्रिय संगीतामध्ये ऐकवला जातो.यातील विलंबित अधिक प्रचलित नाही त्यामुळे या रागात दृत किंवा मध्यलय शृंगार किंवा भक्तीरसात रचना यासाठी हा राग उपयुक्त असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी पं. राम देशपांडे यांच्यासोबत गंधार देशपांडे यांनी ही सहगायन केले. राग .. धानी .. सादर करून ..सुरत पीया की न बिसरा .. हे नाट्यपद सादर करून निर्गुणी भजनाची सुरेख आळवणी देशपांडे पिता-पुत्रांनी केली. त्यानंतर.. इथे कारे उभा श्रीरामा .. सादर करून ..आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना.. ही अनोखी भैरवी सादर करत आपल्या गायन सेवेची सांगता केली.
या बहारदार गायन प्रसंगी सुप्रसिद्ध निवेदक विघ्नेश जोशी यांचे निवेदनही तितकेच बहारदार असे सादर झाले .तर तबल्यावर साथ अभिजीत बारटक्के, पखवाजावर गणेश मिस्त्री, व्हायोलिनवर उदय गोखले ,संवादिनीवर हर्षल काटदरे, ऑर्गनवर सुशील गद्रे आणि तालवाद्याची साथ अभिजीत जोशी यांची होती.या सर्व गायक,वादक व निवेदकांचा सत्कार श्री समर्थ सेवा मंडळाचे वतीने अध्यक्ष गुरुनाथ महाराज कोटणीस यांनी रामनामी शाल ,समर्थ प्रसाद देऊन केला. यावेळी सर्व कलाकारांची ओळख व त्यांचा परिचय मंडळाचे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी अतिशय सुरेखपणे करून दिली .कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण राज्यातून विविध क्षेत्रातील मान्यवर समर्थ भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
