
दैनिक स्थैर्य | दि. ३ ऑगस्ट २०२४ | फलटण |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ ऑगस्ट रोजी मुंबईतील त्यांच्या वर्षा निवासस्थानी इतिहासात प्रथमच संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्यास महाराष्ट्रासह पंजाब, गुजरात व राजस्थान राज्यातील नामदेव भक्त उपस्थित होते.
पालखी सोहळा पत्रकार संघ, भागवत धर्म प्रसारक मंडळ, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना यांच्यासह महाराष्ट्र राज्यातील विविध नामदेव शिंपी समाज संघटनांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करावा, असे निवेदन दिले होते. याची दखल घेत इतिहासात प्रथमच शासकीय स्तरावर संत नामदेव महाराजांचा समाधी सोहळा मुख्यमंत्री शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा बंगल्यावर साजरा करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, संतांनी शांती, समता व बंधुता यांचा विश्वाला संदेश देत भागवत धर्माचा प्रचार व प्रसार करीत सामाजिक ऐक्याचे काम केले. संत नामदेवांचे कार्य महान आहे. त्यांनी भक्ती, प्रेमाच्या जोरावर पंजाब प्रांतात काम केले. पंजाब येथे बांधण्यात येत असलेल्या संत नामदेव महाराष्ट्र भवनसाठी आपण योग्य ते सहकार्य करू.
या कार्यक्रमास पालखी सोहळा पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे, कार्याध्यक्ष राजेंद्र मारणे, उपाध्यक्ष सुभाष भांबुरे, खजिनदार मनोज मांढरे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, श्री क्षेत्र घुमाण(पंजाब)च्या श्री नामदेव दरबार कमेटीचे सरबजितसिंह बावा, सुखजिंदरसिंह बावा, मनजींदरसिंह बावा, नरेंदरसिंह बावा, नासपचे अध्यक्ष संजय नेवासकर, सचिव डॉ. अजय फुटाणे, रोहित येवतकर, अॅड. सागर मांढरे, राजस्थान नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष जसराज सोलंकी, राजेशकुमार गेहलोत, इंदरमल चौहान, वारकरी समाज संघटनेचे राजाभाउ थोरात, गुजरात छिपा समाज संघटनेचे विजय परमार, हिराचंद नानीवाल यांच्यासह शिंपी समाज बांधव उपस्थित होते.