
स्थैर्य, पळसदेव, दि. २९ ऑगस्ट : इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे आज, शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी साईराज पेट्रोलियम आणि साईराज स्टील सेंटर या दोन नूतन व्यवसायांचा उद्घाटन सोहळा राज्याच्या प्रमुख राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.
या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि सातारा जिल्हा बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुकाध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून दोन्ही व्यवसायांचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून, नवीन व्यवसायासाठी श्री. नितीन काळे आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा दिल्या. ग्रामीण भागात अशा प्रकारचे व्यावसायिक उपक्रम सुरू झाल्याने स्थानिक विकासाला चालना मिळते आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आयोजक श्री. नितीन काळे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. राज्याच्या विकासात व्यस्त असूनही सर्व नेत्यांनी वेळात वेळ काढून उद्घाटनासाठी उपस्थिती लावली आणि मार्गदर्शन केले, याबद्दल त्यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले.