‘बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले’
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ऊर्जास्रोत आदरणीय पवारसाहेब आहेत. समाजात कायम सामाजिक बांधिलकीतून जबाबदारी आणि कर्तव्याची धुरा यशस्वीपणे सांभाळणारे सदाबहार व्यक्तिमत्त्व म्हणजे शरदचंद्रजी पवार होत. त्यांच्याविषयी बोलायचे म्हटले तर शब्दांचे भांडार कमी पडेल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य आहे. क्षेत्र कोणतेही असो, कायम सकारात्मक भूमिका सहजपणे, हसतखेळत निभावणे हा साहेबांचा उपजत स्वभाव. आचरण, अनुकरण हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. राजकीय घडामोडींचा विचार केला तर साहेबांची कणखर भूमिका आणि आदर्श अनेकांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. सत्ता असो वा नसो, आपली भूमिका, कर्तव्यनिष्ठा यातून सतत यशाच्या शिखरावर कसे विराजमान व्हायचे हा त्यांचा खरेच समाजकारण आणि राजकारणात काम करणार्यांसाठी मोठा आदर्श आहे.
सर्वसामान्यांसाठी मोठा आधारस्तंभ असणार्या या ‘जाणत्या राजास’ भेटण्यासाठी सर्वसामान्यांना कधीही कोणाच्या वशिल्याची गरज पडत नाही. सर्वसामान्यातील सर्वसामान्य कोणीही गेले तरी त्याची संपूर्ण चौकशी करून तो कोणत्या कामासाठी आला आहे, त्याचे काम होणार असेल; तर हो आणि होणार नसेल तर का होणार नाही, हे स्पष्टपणे सांगून पुढे त्या व्यक्तीला योग्य असे अचूक मार्गदर्शन करण्याचे त्यांच्या कौशल्यामुळे ते आज लाखोंच्या मनात विश्वासार्हतची जागा मिळवून विराजमान आहेत.
पवार साहेबांनी साकारलेल्या व मार्गदर्शक असलेल्या अनेक सामाजिक व सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था गोरगरिबांचा आधार बनल्या असून, राज्यात नावाजल्या आहेत. साहेबांच्या कर्तृत्वामुळे बारामती तालुक्यात शिक्षणसंस्थांचा परीघ इतका विस्तारला असून, पुणे-मुंबईत जाऊन शिक्षण घेण्याची गरज उरलेली नाही. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील विद्यार्थी शालेय, व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी बारामतीच्या सावलीला येतात. त्यामुळे आज शेतकर्यांच्या घराघरांत इंजिनिअर, विज्ञान पदवीधर, फार्मासिस्ट दिसत आहेत. इतका कार्यतत्पर आणि इतकी प्रशासनावर त्यांच्यासारखी पकड असणारा राज्यात दुसरा नेता नसेल.
बारामतीमधील त्यांच्या घरी म्हणजे गोविंदबागेत साहेब असले की, सर्वसामान्यांना खास करून शेतकर्यांना आवर्जून वेळ देण्याची त्यांची कला अफलातून आहे. शेतीत केलेले वेगळे प्रयोग, शेतीपूरक व्यवसायातून केलेली प्रगती, शेतीशी संबंधित विविध प्रकल्प यांची खास माहिती अगदी बारकाईने जाणून घेऊन शेतकर्यांना अजून पुढे प्रगती कशी करायची, याचे मागदर्शन करणारे ‘साहेब’ म्हणजे शेतकर्यांसाठी निसर्ग शिक्षकच आहेत. असा कोणताच प्रश्न नाही की त्याचे उत्तर साहेबांकडे नाही. घर असो, गाव असो, राज्य, देश असो, परदेशही असो सर्वत्र सुसंवाद ठेवून आपल्या सुसंस्कृत सभ्यतेचा आदर्श साहेबांचा खरेच प्रेरणादायी आहे. शेतकर्यांसाठी साहेब म्हणजे एक कृषी विद्यापीठच आहेत.
आतापर्यंतच्या जीवनप्रवासात साहेबांनी सामाजिक बांधिलकी जपून, कर्तव्य आणि जबाबदारीची धुरा सांभाळत माणुसकीचे विणलेले जाळे अतूट, अखंड आहे. पुरूष कितीही कर्तृत्ववान असला, तरी तो एका मातेच्या उदरातून जन्म घेतो आणि तो जसा घडतो, त्यामध्ये आईची भूमिका अतिशय महत्त्वाची असते, हे साहेब आवर्जून सांगतात. भारतासारख्या पुरूषप्रधान देशात स्त्रियांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मान, सन्मान आणि आरक्षण देण्यासाठी साहेबांची भूमिका खूप महत्त्वपूर्ण आहे. आम्ही भावंड जे घडलो ते आमच्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्यामुळेच असा उल्लेख ते आवर्जून करतात. साहेबांच्या हृदयात त्यांच्या मातोश्रींविषयीची अपार श्रद्धा सातत्याने विविध प्रसंगातून दिसून येते. कर्तृत्ववान स्त्रियांचे ते कायम कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देतात. त्यामुळे ते अनेकांसाठी मोठा आधारवड आहेत. राज्यात अखंड चोवीस तास लोकांच्या सेवेत असणारे नेते फार कमी आहेत. त्यांच्याकडे समस्या घेऊन येण्यामध्ये सर्व धर्माचे, सर्व जातींचे, सर्व वयोगटातील लोक असतात. तरुण, महिला, युवती, ज्येष्ठ या सगळ्यांचे ते ऐकून घेऊन निरसन करण्याचा प्रयत्न करतात. शक्य झाले नाही तर सगळ्यांची निवेदने घेऊन प्रत्येक निवेदनाची नोंद ठेवतात. जिल्ह्याचा, राज्याचा सहकाराचा भार पेलत असतानाच त्यांनी स्वतःच्या घरच्या बारामती तालुक्यात जो सहकार समृद्ध केला आहे, तो अन्यत्र कुठेच आढळणार नाही.
अंधारमय असंख्य जिवांना प्रज्ज्वलित प्रकाश देणारा एक ऊर्जास्रोत आहेत. जिरायती भागातील शेतकरी, नागरिक यांच्या व्यथा कायम प्राधान्याने सोडविणारा सर्वसामान्यांचा आधार आहे. आज समाजात राजकारण आणि सत्ता यामध्ये काहीही उलटापालट झाली तरी कायम सर्वांचा उत्साह वाढेल, असे आचरण करून सदाबहार चर्चेत राहणारे, अनेकांच्या मनावर अधिराज्य टिकवून ठेवलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे साहेब आहेत. त्यांच्या विचारांचा स्पर्श झाला नाही, असे समाजात क्षेत्रच नाही. राजकीय क्षितिजावरील ते तळपणारे व्यक्तिमत्त्व आहेत. शिवाय सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, सहकार अशा विविधांगी क्षेत्राची चौफेर जाण असणारा हा नेता आहे. प्रत्येक क्षेत्राचा बारकाईने अभ्यास आहे. ते अडचणींचा निपटारा तिथल्या तिथे करतात. काम होणार असेल तर हो म्हणतात; नसेल तर तसे स्पष्ट सांगतात. विषय कोणताही असो कुठेही आडपडदा न ठेवता योग्य असे मार्गदर्शन साहेब करतात. त्यामुळे अनेकांसाठी मार्गदर्शक साहेब ठरलेले आहेत.
शरद पवार नाव असले तरी सर्वसामान्यांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांनी ‘साहेब’ पदवी देऊन खर्या अर्थाने गौरव केला आहे.
साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
लेखक : श्री. धनंजय धुमाळ
संचालक : जय भवानी बायोमेडिकल,
बारामती एमआयडीसी.