मुधोजी महाविद्यालयात प्राचार्य विश्वासराव देशमुख यांचा सहस्त्र चंद्रदर्शन कृतज्ञता सोहळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १८ जून २०२२ । फलटण । मुधोजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी, माजी प्राध्यापक, माजी मराठी विभाग प्रमुख व माजी प्राचार्य विश्वासराव देशमुख यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त मुधोजी महाविद्यालय फलटण येथे त्यांचा सहस्र चंद्रदर्शन कृतज्ञता सोहळा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे माजी सदस्य मा. हंबीरराव भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे व्हाईस चेअरमन मा. रमणलाल दोशी होते. या सोहळ्यास फलटण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. अशोकशेठ दोशी तसेच श्री शिवाजीराव घोरपडे, श्री चंद्रकांत पाटील, श्री शिरीष हंबीरराव भोसले, श्री शरद रणवरे, श्री बाबासाहेब गंगावणे, सौ. वसुंधरा नाईक निंबाळकर, सौ. नूतन शिंदे हे फलटण एज्युकेशन सोसायटीच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सन्माननीय सदस्य आणि फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम व महाविद्यालय विकास समितीचे सदस्य मा. अरविंद मेहता हे मान्यवर उपस्थित होते.

मुधोजी महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये प्राचार्य विश्वासराव देशमुख यांचे बहुमोल योगदान आहे. या महाविद्यालयात त्यांनी सुमारे ३७ वर्षे सेवा केली. या कार्यकाळात महाविद्यालयाच्या इमारती, मैदानांची निर्मिती तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, कलाविष्कार, जिमखाना इत्यादी विविध उपक्रमांच्या यशस्वी वाटचालीत त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली आहे. याशिवाय मराठी विभागातील विद्यार्थी केंद्रबिंदू मानून राबविलेल्या विविध उपक्रमांत त्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. महाविद्यालयातील विविध समित्यांचे प्रमुख व सदस्य म्हणूनही त्यांनी वेगवेगळे उपक्रम यशस्वीपणे राबविलेले आहेत. याशिवाय प्राचार्य म्हणून प्रशासनातील अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांनी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीपणे पार पाडली. महाविद्यालयातील त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून मराठी विभागाच्यावतीने त्यांचा सहस्रचंद्रदर्शन कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमात प्राचार्य देशमुख यांचा मानपत्र, संत तुकारामांची प्रतिमा, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी निवृत्त इंग्लिश विभाग प्रमुख प्रा. विक्रम आपटे, गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य प्रा. चंद्रकांत पाटील, महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य मा. अरविंद मेहता, वर्गमित्र मा. मदने साहेब, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी मा. प्राचार्य अरविंद निकम व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम यांनी सत्कारमूर्तीं विषयीच्या आठवणी, त्यांचे महाविद्यालयीन कार्य, व्यक्तिगत जीवन याविषयी आपली मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. रमणलाल दोशी यांनी प्राचार्य देशमुख यांना पुढील जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. सत्काराला उत्तर देताना प्राचार्य देशमुख यांनी आपले जीवन व महाविद्यालयातील कार्यकाळ याबाबत अत्यंत मोकळेपणाने आपले विचार मांडले. या प्रवासात आपले आई-वडील, मित्र-परिवार, श्रीमंत मालोजीराजे, श्रीमंत शिवाजीराजे, श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे, व नाईक-निंबाळकर राजघराण्यातील युवापिढी बाबत कृतज्ञता व्यक्त केली. या राजघराण्यामुळेच आपणास महाविद्यालयीन कार्यकाळात आणि त्यानंतरच्या जीवन प्रवासात चांगले कार्य करता आले. तसेच त्यांनी वेळोवेळी सोपविलेल्या जबाबदाऱ्या आपण प्रामाणिकपणे व निष्ठेने पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

मराठी विभागाने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्वीकार केला. तसेच येथून पुढील काळात ही मराठी विभाग, महाविद्यालय आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांच्याशी आपले ऋणानुबंध कायम राहतील अशी त्यांनी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रभाकर पवार यांनी केले. प्रा. डॉ. अशोक शिंदे यांनी मानपत्राचे वाचन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. संजय दीक्षित यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्र-संचालन प्रा. लक्ष्मीकांत वेळेकर व प्रा. अभिजीत धुलगुडे यांनी केले.

या कार्यक्रमास सत्कारमूर्तींचे कुटुंबीय, स्नेही, मित्र परिवार, सेवा निवृत्त प्राध्यापक, महाविद्यालयीन विकास समिती सदस्य, विभाग प्रमुख तसेच वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व सेवक वर्ग यांची उपस्थिती लाभली.


Back to top button
Don`t copy text!